Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

शहाणपणा करू नका : राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना झापले

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत (Raj Thackeray Ayodhya tour) उत्सुकता आहे. त्यामुळे पक्षाचे अतिउत्साही प्रवक्ते आणि पदाधिकारी याबाबत मनानेच काही गोष्टी सांगत आहेत. ही बाब लक्षात आल्याने अखेरीस राज ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना झापले आहे.

माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत. ते याबाबत बोलतील. इतर कोणीही बोलण्याचा शहाणपणा करू नये. तसेच इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे. त्यांनीही जबाबदारीने बोलावे. तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहिलयं ते पक्षातील सर्वांनी गांभीर्याने घ्यावे, असे राज यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दुसरीकडे पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांनीही याबाबत पत्रक आज काढले. पक्षशिस्तीचे पालन करावेच लागेल, असा इशारा सरदेसाई यांनी आपल्या पत्रकात दिला आहे. पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यमांपुढे मांडण्याचे काम पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी करत असतात. त्यांच्याशिवाय इतर कोणीही प्रसारमाध्यमांपुढे राजकीय भूमिकांबाबत भाष्य करू नये. पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांवर वा अन्य कोठेही टीकाटिप्पणी करताना भाषेचे भान बाळगावे, अशीही सूचना सरदेसाई यांनी पत्रात दिली आहे.

मनसेला आज दिवसभरात दोन वेळा भूमिका स्पष्ट करावी लागली. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. कोणते नेते हे जबाबदारी सोडून बोलले, याचा शोध कार्यकर्ते घेत होते. प्रसारमाध्यमांतही राज यांचा हा इशारा कोणाकडे आहे, याची उत्सुकता होती. पुण्यातील काही नाराज नेते सध्या प्रसारमाध्यमांत गाजत आहेत. त्यांच्याकडे तर सरदेसाई यांच्या पत्राचा निर्देश नाही ना, अशीही शंका घेण्यात येत आहे. पुण्यातील या नेत्यांनी आज महाआरती घेतली पण तेथे पक्षाचे नेते उपस्थित नव्हते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT