पुणे : मनसेचे (MNS) माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी आज कात्रज भागातील त्यांच्या ऑफिससमोरील हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते. मात्र, या महाआरतीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांचीही गैरहजेरी होती, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पोलिस ठाण्यासमोर महाआरती करण्याचा मनसेचा इशारा होता. मात्र मोरे यांनी तसे केले नाही. तसेच मनसेचे शहरप्रमुख व मोरे यांचे मित्र साईनाथ बाबर यांची अनुपस्थितीही नजरेत भरली.
राज ठाकरे आजपासून तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते वसंत मोरे यांच्या महाआरतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही, अशी चर्चा दिसभर रंगली होती. मात्र, राज ठाकरे यांनी महाआरतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही, त्याच बरोबर शहरातील इतर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही गैरहजर होते.
वसंत मोरे यांनी महाआरतीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केल्याचे सांगितले जात आहे. यावेळी हनुमानाची पूजा अर्चना करताना बहुसंख्य हिंदू आणि काही मुस्लीम कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी आरती झाल्यानंतर वसंत मोरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
ते म्हणाले, सर्व नागरिक उपस्थित राहिले. मुस्लिम बांधव ही महाआरतीला उपस्थित राहिले. मी सुरुवातीपासून भुमिका मांडली होती, माझा राज साहेबांना किंवा पक्षाला विरोध नव्हता. तुम्हला माहिती आहे की तात्या जी भूमिका मांडतो, ती योग्यच असते. तुमची सगळ्यांची ताकद माझ्या आणि पक्षाच्या पाठीशी आहे, ती तसीच रहावी, असे वसंत मोरे यावेळी म्हणाले.
मी काल आरतीसाठी परवानगी घेलती होती. शहरात अनेक ठिकाणी आरती झाल्या. मात्र, राज ठाकरे यांच्या हस्ते जी आरती झाली त्यातच खरा जोश होता. मला शहरातील पदाधिकारी यांना हेच दाखवायचे आहे की आपण जर पोलिस स्टेशन कडून रीतसर परवानगी घेतल्या असत्या तर अश्याच प्रकारे आपण आरती करू शकलो असतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
मी राज ठाकरेंना या आरतीची माहिती दिली होती. ही आरती कात्रजची होती, मी उपनगरचा नगरसेवक आहे. माझ्या प्रभागात हनुमान चालीसा लावायची गरज पडली नाही. मला हनुमान चालीसा पोलिस स्टेशन समोर वाजवण्याची गरजच पडणार नाही. पक्षामध्ये काही जण `पार्ट टाईम जॉब` करतात. अनेक जण आहेत की पक्षाची जाहिरात वापरून घेतात आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात, असा टोलाही मोरे यांनी मनसेच्याच पदाधिकाऱ्यांना लावला. आज अतृप्त आत्मे माझ्याभोवती फिरणार पण नाहीत, असेही मोरे यांनी सांगितले. दरम्यान, महाआरतीची माहिती देताना मोरे यांनी फेसबूक पोस्ट केली होती. ते म्हणाले होते की, मी तीन दिवस तिरुपती बालाजीला असल्याने आरतीचे नियोजन झाले नव्हते. मात्र, आज शनिवार असल्याने आणि पोलिसांनी देखील परवानगी दिल्याने महाआरतीचे नियोजन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.