Implications for Regional Language Policies : हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट राज्य सरकारलाच आता आव्हान देत मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. येत्या ६ जुलैला गिरगाव चौपटी येथून त्यांचा मोर्चा निघणार होता. पण आता काही तासांतच या मोर्चाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
मोर्चाच्या तारखेत बदल करण्यात आल्याची माहिती राज ठाकरे यांनीच सोशल मीडियातून दिली आहे. त्यानुसार आता हा मोर्चा 5 जुलैला असणार आहे. मोर्चाचे ठिकाण आणि वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, राज ठाकरेंनी हा बदल का केला, याचे कारण सांगितलेले नाही.
राज ठाकरेंनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे. हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी.
दरम्यान, येत्या 6 जुलैला आषाढी एकादशी असल्याने मोर्चाची तारीख बदलण्यात आल्याचे समजते. मोर्चामध्ये पक्षीय हेवेदावे विसरून मराठीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मराठी भाषा कृती समितीने आयोजित केलेल्या धरणे आंदोलना पाठिंबा दिला आहे. हे आंदोलन आझाद मैदानात ७ जुलैला होणार आहे.
हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येणार का, याची चर्चा आता सुरू झाली आहे. राज ठाकरेंनी आपण सर्व पक्षांशी बोलणार असल्याचे सांगितले आहे. ते उद्धव ठाकरेंशीही याबाबत बोलून एकत्रच मोर्चा काढण्याबाबत त्यांचे मन वळवणार का, अशा चर्चांनाही उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.