Raj Thackeray
Raj Thackeray  sarkarnama
मुंबई

Raj Thackeray Nagpur Visit : हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर, काय आहे कारण?

सरकारनामा ब्यूरो

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी काळात होणार्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विविध भागांचे दौरे करत मनसे नेते पदाधिकार्यांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे. यातच ठाकरे हे आज (दि.23) नागपूर दौर्यावर आहेत. हिवाळी अधिवेशन वादळी ठरत असतानाच आणि तीन महिन्यांत दुसर्यांदा राज ठाकरे( Raj Thackeray) नागपूरला जात आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाँना उधाण आले आहेत.

राज ठाकरे हे नागपूर दौऱ्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार असून विदर्भातील पक्षविस्तारासाठी स्थानिक नेत्यांशी बैठका घेणार आहेत. तीन महिन्यात दुसऱ्यांदा राज ठाकरे नागपूरमध्ये येत असल्यानं त्यांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. यावेळी नवीन शाखाध्यक्षांना नियुक्ती पत्र देखील देण्यात येणार आहेत. शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ठाकरे हे नागपूरकडे रवाना झाले आहेत.

सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांनी सध्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहेत. याचवेळी मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील नागपुरात दाखल झाले आहेत. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या दौर्यामागे ठाकरे यांची आणखी काही वेगळी राजकीय खेळी आहे का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राज ठाकरे यांनी यापूर्वी सप्टेंबर महिन्यात नागपूर दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे एकत्र आले होते. त्यामुळं आता या दौऱ्यात कोणत्या राजकीय नेत्यांची भेट घेणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.

''... तर आधी राजीनामा द्या. मग काय घाण करायची असेल ती करा..''

“सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाटेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स यामुळे हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही,” असं राज ठाकरेंनी ठणकावलं आहे.

पुढे ते म्हणालेत की “माझ्या पक्षातल्या कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्याशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या. मग त्यानंतर काय घाण करायची असेल ती करा”. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील प्रत्येकाने पक्षशिस्त पाळायलाच हवी !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT