मुंबईत आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बदलत्या विद्यार्थी पिढीबाबत परखड भूमिका मांडली. विद्यार्थी संघटनांनी काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक असल्याचे सांगतानाच त्यांनी 'जेन झी' पिढीच्या विचारसरणीला समजून घेण्याचा सल्ला दिला. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचाही संदर्भ देत भाजपच्या ट्रोल संस्कृतीवर निशाणा साधला.
राज ठाकरे म्हणाले, "मी ज्यावेळी कामाला सुरुवात केली, तेव्हाचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ पूर्णपणे वेगळा आहे. तेव्हाचे विषय वेगळे होते, आजचे विषय वेगळे आहेत. तेव्हाचे विद्यार्थी वेगळे होते आणि आजचे विद्यार्थीही वेगळे आहेत. आता 'जेन झी'ची पिढी आहे. या मुलांचं म्हणणं काय आहे, त्यांना नेमकं काय हवं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे."
विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी नव्या पिढीकडे केवळ शहरांपुरते मर्यादित पाहू नका, असेही स्पष्ट केले. "माझी विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की, 'जेन झी' म्हणजे फक्त इंग्रजी बोलणारी मुंबई, पुणे किंवा दिल्लीतील मुलं नाहीत. 1997 नंतर जन्माला आलेली मुलं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही आहेत. त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या आशा आणि त्यांची विचार करण्याची पद्धत समजून घेणं आवश्यक आहे. जुन्या कल्पना आता सोडल्या पाहिजेत," असे ते म्हणाले.
भाषणादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील वक्तव्याचाही उल्लेख केला. "मी पंतप्रधानांचं निवेदन पाहिलं. त्यांनी म्हटलं की, ज्या प्रकारचे व्हिडीओ आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली, ती अयोग्य आहे. मला ते मान्य आहे. अशी भाषा वापरली जाऊ नये. पण मला नरेंद्र मोदींना एवढंच सांगायचं आहे की, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा. गेल्या 12 वर्षांत याची सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाच्या ट्रोल टीमने जे काही सुरू केलं, त्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही जे पेराल, तेच उगवतं," अशी टीका त्यांनी केली.
याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी पुढे म्हटले, "नरेंद्र मोदी म्हणतात की, 'त्या मुलांना मी माफ केलं.' पण गेल्या 12 वर्षांत तुमच्या पक्षातील लोकांनी जे केलं, त्याबद्दल माफी कोण मागणार? जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या खेळाडूंची डोकी फोडली गेली, त्याचं काय?" असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि भाजपच्या राजकारणावर सडकून टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.