Uddhav Thackeray, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj-Uddhav Thackeray : अखेर शिक्कामोर्तब! राज-उद्धव ठाकरेंचे पहिल्यांदाच संयुक्त निवेदन; म्हणाले, गुलाल उधळत या…

Joint Statement on Marathi Victory Rally by Raj and Uddhav Thackeray : हिंदी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारविरोधात रान पेटवलं होते. राज ठाकरेंनी जाहीर केलेल्या मोर्चाला उद्धव ठाकरेंनीही साथ दिली होती.

Rajanand More

Mumbai News : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याची नांदी झाली असून येत्या 5 जुलैला पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज ठाकरे बंधूंनी एकत्रित निवेदन प्रसिध्द करत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

हिंदी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारविरोधात रान पेटवलं होते. राज ठाकरेंनी जाहीर केलेल्या मोर्चाला उद्धव ठाकरेंनीही साथ दिली होती. त्यानंतर सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले आणि हा मोर्चाही रद्द करण्यात आला. पण आता दोन्ही बंधूंकडून मराठीचा विजयी मेळावा याच दिवशी घेतला जाणार आहे.

मेळाव्यासाठी अद्याप ठिकाण निश्चित झाले नसले तरी दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट करत दोन्ही बंधूंचे संयुक्त निवेदन प्रसिध्द केले आहे. त्यामध्ये मराठी बांधवांना जल्लोषात मेळाव्याला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव असलेले संयुक्त निवदेन अनेक वर्षांनंतर प्रसिध्द झाले आहे.

काय म्हटले आहे निवेदनात?

आवाज मराठीचा... मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं..! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुध्दा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजतगाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या. आम्ही वाट बघतोय, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्याखाली आपले नम्र राज ठाकरे – उद्धव ठाकरे असे म्हटले आहे.  

दरम्यान, मोर्चा रद्द करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी राज ठाकरेंना विजयी मेळाव्याबाबत विचारणा करण्यासाठी फोन केला होता. त्यानंतरच हा मेळावा निश्चित झाल्याचे राज ठाकरेंनीच सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते. या मेळाव्याला कोणतेही राजकीय लेबल न लावण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या मेळाव्याचे नेतृत्व मराठीजन करतील, असेही ते म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT