BJP and Rajendra Gavit Sarakarnama
मुंबई

Rajendra Gavit News : पालघरसाठी राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला भाजपकडून अगोदर झाला विरोध मात्र नंतर..!

Palghar Lok Sabha Constituency : राजेंद्र गावित यांच्या नावाला विरोध असल्याचे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वसई शहराध्यक्ष महेश सरवणकरांकडून गेले होते.

संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा

Loksabha Election 2024 : पालघर लोकसभेसाठी महायुतीतून उमेदवार कोण याचा तिढा अजून सुटलेला नाही. या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला असतानाच वसई भाजपमधून राजेंद्र गावित यांच्या नावाला विरोध असल्याचे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वसई शहराध्यक्ष महेश सरवणकर यांनी लिहिल्याचे समोर आले होते.

यानंतर त्यावर शिंदे गटाकडून कठोर शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर आता भाजपने विरोधावर घुमजाव केले असून नरेंद्र मोदी हेच पालघर लोकसभेत महायुतीचे उमेदवार असतील ते सांगून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत पक्षाचे प्रवक्ते मनोज बारोट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात जल्लोष असतो. त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्तेही आपल्या संघटनेकडून पक्षाचे निवडणूक चिन्ह व उमेदवाराची मागणी करतात आणि उमेदवार जाहीर होईपर्यंत हे सुरूच राहते. तसेच गेल्या काही दिवसांपासून पालघर लोकसभेसाठी महायुतीचे चिन्ह व उमेदवार याबाबत वृत्तपत्रे व अन्य माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान भाजप वसई शहर अध्यक्ष महेश सरवणकर यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केलेल्या मागणीबाबत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर भाजप वसई विरार जिल्ह्याचे अधिकृत प्रसिद्धी प्रमुख मनोज बारोट यांनी आपली प्रतिक्रिया देताना महेश सरवणकर हे बहुधा अतिउत्साहात असल्याने त्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली असावी असे म्हटले आहे.

तसेच ही त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते . भाजपची तशी प्रतिक्रिया किंवा भूमिका अजिबात नव्हती आणि नाही. कारण भाजपकडून सर्व निर्णय आपल्या मित्र पक्षासोबत असणाऱ्या युतीचा धर्म पाळून घेतला जातो. भाजपच्या श्रेष्ठ नेतृत्वाकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे भाजप जिल्हाध्यक्ष ते बूथ स्तरावरील कार्यकर्ते काम करतात आणि त्याचे उदाहरण आपण सर्वांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पाहिले आहे. त्यामुळे भाजपने महेश सरवणकर यांच्या भूमिकेचे खंडण करत पालघर लोकसभेसाठी कोणतेही चिन्ह व उमेदवार जाहीर केला, तरी प्रत्येक भाजप कार्यकर्ता आपला उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यानांच मानून काम करेल असे स्पष्ट केले आहे.

तसेच पालघरच्या खासदाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून देऊन महायुतीचे कार्यकर्ते दिल्लीला पाठवतील असा विश्वास पालघर लोकसभा मित्रपक्ष समन्वयक राजन नाईक व भाजप वसई विरार जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे. या निवेदनामुळे अगोदरच्या राजेंद्र गावितांच्या भूमिकेवर भाजपला सपशेल माघार घावी लागल्याचे बोलले जात आहे.

पालघर मध्ये राजेंद्र गावीतच महायुतीचे उमेदवार असणार असल्याचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांनी स्पष्ट केले असून या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT