Dombivali News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'इंटरेस्ट' असलेल्या 'एमएमआरडीए'च्या कारभारावरून आता मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील चांगेलच आक्रमक झाले आहेत, त्यांनी डोंबविलीतील वाहन कोंडीवरून ट्विट करीत प्रशासनाची कान उघडणी केली.
कल्याण-शीळ रोडचे रुंदीकरणचे काम पूर्ण न झाल्याने या मार्गावरील वाहन कोंडीची समस्या सुटलेली नाही. त्यासोबतच 'एमएमआरडीए'ने मेट्रोचे काम सुरु केले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे काम हाती घेतल्याने हा रस्ता अरुंद झाल्याने वाहन चालकांची गैरसोय होत असल्याने आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी ट्विट करून प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.
लोकसभा निवडणूका (Loksabha Election) पार पडल्यानंतर आमदार राजू पाटील डोंबिवलीकरांच्या समस्येवरून आक्रमक झाले आहेत. एमएमआरडीएच्या नियोजन शून्य कारभारामुळे ऐन पावसाळ्यात समस्या उद्भवणार आहेत, त्यामुळे प्रशासनावर टीका करताना त्यांनी डोंबिवलीकरांसाठी कामाची नसलेली मेट्रो त्यांचीच वाट अडवून बसली आहे, असे ट्विट करत समस्येला वाचा फोडली आहे.
कल्याण, डोंबिवलीच्या वाहनचालकांना रस्ते मार्गे ठाणे, मुंबई, नवी मुंबई जायचे असल्यास कल्याण-शीळ रोड हा एकमेव मार्ग आहे. वाढते शहरीकरण आणि वाहन चालकांची संख्या पाहता या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाहन कोंडीची ही समस्या सोडवण्यासाठी या मार्गाचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणचे काम हाती घेण्यात आले. बहुतांश ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया अडल्याने या मार्गाचे पूर्णपणे रुंदीकरण झाले नाही.
त्यामुळे वाहन चालकांना आज ही वाहन कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात वाहनांचा वेग मंदावत असल्याने, तसेच गटारांची बांधणी झाली नसल्याने रस्त्यावर पाणी साचल्याने या कोंडीत आणखी भर पडते. यंदा ही पावसाळ्यात वाहन कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे. या मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आल्यानंतर आता मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे.
यामुळे रस्त्याच्या मधोमध मेट्रोचे खांब उभारणीचा पाया खोदला जात आहे. यामुळे वाहन कोंडी होत असून पावसाळ्यात ही समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावरून आता मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाचे कान ट्विट करून कान खेचले आहेत.
(Edited by : Sachin Waghmare)