BJP Leader Ashish Shelar Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

शिवसेनेचे आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेलात शेलार गेले अन् केसरकरांशी बोललेही!

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काऊंटडाऊन सुरू....

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. सर्व राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच बुधवारी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी थेट शिवसेनेच्या आमदारांचा मुक्काम असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये एंट्री केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. हॉटेलमध्ये ते शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्याशी बोलत असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. त्यामुळे शेलार हॉटेलात कशासाठी गेले, यावरून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. (Ashish Shelar Latest Marathi News)

मागील तीन दिवसांपासून शिवसेनेचे (Shiv Sena) सर्व आमदार ट्रायडंट हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. याच हॉटेलात महाविकास आघाडीची बैठकीही झाली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सर्व आमदारांना एकत्र ठेवलं आहे. तसेच इतर पक्षांकडूनही दक्षता घेतली जात आहे. पण प्रामुख्याने भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये टक्कर आहे. (Rajya Sabha Election Latest News)

शिवसेनेच्या सहाव्या उमेदवारासाठी प्रत्येक आमदाराचे मत महत्वाचे असल्याने विशेष काळजी घेतली जात आहे. त्यातच शेलार हे बुधवारी याच हॉटेलात आले होते. त्यांच्यासोबत एक भाजपचे पदाधिकारीही होते, अशी चर्चा आहे. जवळपास तासभर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. यादरम्यान शिवसेनेचे नेते व माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

शेलार यांचे चहापान सुरू असलेल्या टेबलजवळ जाऊन केसरकर यांनी शेलारांशी हात मिळवल्याचे दिसते. तसेच ते एकमेकांशी काहीतरी बोलत असल्याचेही व्हिडीओत दिसते. त्यामुळे दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, शेलार त्याच हॉटेलमध्ये का आले, अशा अनेक चर्चांना ऊत आला आहे.

शेलार ज्याठिकाणी बसले होते तिथून काही अंतरावरच सुनिल प्रभू यांच्यासह सेनेचे अन्य काही आमदारही दिसत होते. त्यामुळे त्यांची नजरानजर झाल्याचेही दिसते. काही वेळानंतर शेलार आणि त्यांच्यासोबत आलेले एक पदाधिकारी तिथून निघून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT