Ramdas Kadam sarkarnama
मुंबई

मी पाठीत खंजीर खुपसणारा नव्हे : व्हायरल क्लिपवर रामदास कदमांचा खुलासा

कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वादाला मोठी फोडणी मिळाली असून आपल्याच पक्षातील नेत्यांविरोधात कटकारस्थान रचल्याचा वाद पुढे आला आहे. हा वाद माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) आणि विद्यमान मंत्री अनिल परब (Anil Parab) या दोन नेत्यांतील. कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परब यांच्याविरोधातील पुरावे कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा, या ऑडिओ क्लिपद्वारे केला जात आहे. मात्र, कदम यांनी ही क्लिप आपली नाही. आपला आवाज वापरला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हे ऑडिओ क्लिपचे प्रकरण समोर आल्यानंतर कदम यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील माझ्या आवाजाच्या ऑडिओ क्लीप व्हायरल करण्यात आल्या होत्या. त्या ऑडिओच्या माध्यमातून मी मुस्लिम समुदायाला शिवीगाळ करत असल्याचा दावा करण्यात आला होता. दहावेळा या विषयावर पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणी मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. प्रसाद कर्वेसोबत माझा कोणताही संबंध नाही. सोमय्यांशी माझा कुठलाही संबंध नाही. जो मुलगा आहे तो वैभव खेडेकरांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्या दोघांनी मिळून हे केले, असावे असे मला वाटते, असे कदम यांनी सांगितले.

परब यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मी शिवसेनेचा नेता आहे, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. अनिल परब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. माझा मुलगा तिथे आमदार आहे. संजय कदम यांना पाडून तो आमदार झाला आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो. हे पाप आहे ते माझ्या हातून होणार नाही. खोट्या क्लीप व्हायरल करुन मला बदनाम करण्याचे प्रयत्न अनेक वेळा झाले आहेत. माझ्या विरोधात बोलल्यानंतर मोठी प्रसिद्धी मिळते.

या आधाही माझी बदनामी केल्याचा दावा दाखल केला आहे. मी पुन्हा न्यायालयात जाणार आहे. सोमय्या यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. मी पाठीत खंजीर खुपसणारा नाही. विधानसभा निवडणुकीच्यावेळी अशा क्लीप व्हायरल करुन मला बदनाम केले गेले. दोनदा पत्रकार परिषदा घेऊन मी मंत्रीपद स्वीकारणार नाही, असे जाहीर केले होते. पक्षावर माझी कोणतीही नाराजी नाही. खोट्या क्लीप बनवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणा संबंधात मी कदाचित एक-दोन दिवसात उद्धव ठाकरे यांची भेट घेऊल असे, कदम यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT