Ratan Tata Dead Sarkarnama
मुंबई

Ratan Tata Career : अशी होती रतन टाटा यांची संपूर्ण कारकीर्द!

Mayur Ratnaparkhe

Ratan Tata Death News : प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचे मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात बुधवारी निधन झालं आहे. वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वयोमानामुळे उद्भवलेल्या प्रकृतीशी निगडीत समस्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

त्यांच्या निधनामुळे देशाचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. रतन टाटा हे विविध कारणांमुळे कायम चर्चेत असायचे. कधी उद्योगातील मोठी भरारी, तर कधी सामाजिक कार्य याशिवाय त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक घटनांमुळेही ते चर्चेत असायचे.

रतन टाटांचा (Ratan Tata) जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला होता. ते टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे पुत्र होते. रतन टाटांचे शालेय शिक्षण मुंबई झाले होते. त्यांनी कॉर्नेल यूनिवर्सिटीतून आर्किटेक्चर बीएस आणि हार्वर्ड बिजेनसस्कूलमधून अ‍ॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम असं शिक्षण घेतलं होतं.

रतन टाटा यांनी 1962 मध्ये टाटा समूहासोबत आपले करिअर सुरू केलं होतं. ते १९९१मध्ये जेआरडी टाटा यांच्यानंतर समूहाचे पाचवे अध्यक्ष बनले होते. रतन टाटा यांना वर्ष २०००मध्ये पद्मभूषण आणि २००८मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं.

रतन टाटांनी टेटली, जग्वार लॅण्ड रोव्हर आणि कोरस सारख्या कंपन्यांचे टाटा समूहात अधिग्रहण केले होते. त्यांनी नॅनो सारखी कार बनवून सर्वसामान्यांचं कार घेण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं होतं. याशिवाय त्यांनी इंडिका सारखी प्रसिद्ध कारही बाजारात आणली होती.

तसं बघितलं तर रतन टाटा यांचं टाटा परिवाराशी रक्ताचं नातं नव्हतं. त्यांचे वडील नवल एच टाटा हे सर रतन टाटा आणि त्यांची पत्नी नवजबाई सेठ यांचे दत्तक पुत्र होते. लहानपणीच रतन टाटा यांचे आई-वडील विभक्त झाले होते, मात्र तरीही ते त्यांच्या आईजवळ होते.

रतन टाटा हे जेव्हा टाटा समूहात आले होते, तेव्हा कंपनीची एकूण उलाढाल एक हजार कोटी रुपये होती. तर २०११-१२मध्ये समूहाचा महसूल ४७५.७२१ कोटी रुपये झाला होता. टाटाने विकसित देशांमधील अनेक अशा कंपन्यांचे अधिग्रहण केले ज्या त्यांच्या देशात सुपर ब्रॅण्ड होत्या. आज टाटा समूहाचे जाळे जगभरात पसरलेले आहे. रतन टाटा यांनी त्यांचा दोन दशकांहून अधिकच्या कारकिर्दित टाटा समूहाला सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले.

मुंबई दहशतवादी हल्ल्यात त्यांचे पंचतारांकीत हॉटेल लक्ष्य केले गेले होते, तेव्हा त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सढळ हाताने मदत केली होती. ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर रतन टाटा स्वत: तिथे पोहचले होते.

ते जखमी कर्मचाऱ्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला होता. त्यांनी केवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच नाहीतर आसापासच्या हातगाडीवाल्यांनाही मदत केली होती. २००२मध्ये वयाच्या ६५व्या वर्षी रतन टाटांनी पहिल्यांदा निवृत्ती घेण्याचे जाहीर केले होते, मात्र तेव्हा त्यांना कंपनीने निवृत्त होवू दिले नव्हते. त्यानंतर तीन वर्षांनी पुन्हा तीच परिस्थिती आल्यावर कंपनीने सेवानिवृत्तीचे वय ७५ वर्षे केले होते. त्यानंतर २८ डिसेंबर २०१२ रोजी निवृत्त झाले होते.

चारवेळा प्रेमात पडले होते रतन टाटा? -

रतन टाटा आपल्या प्रोफेशनल लाइफबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींवरूनही बरेच चर्चेत होते. रतन टाटांनी सांगितलं होतं की, ते एकदा नव्हे तर चारदा प्रेमात पडले होते. एकदा तर ते बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात होते. त्यांनी आपल्या प्रेमाबाबत २०११मध्ये सांगितलं होतं. वर्ष १९७०मध्ये त्यांचे आणि अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांची रिलेशनशिप चांगलीच चर्चेत होती.

विशेष म्हणजे सिमी ग्रेवाल यांनीही एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्यात खूप घट्ट नातं होतं. दोघांना अनेकदा एकत्र बघितलं गेलं होतं. दोघेही एकमेकांशी विवाह करू इच्छित होते, परंतु त्यांच्या नशीबात एकमेकांशी विवाहाच योग नव्हता.

दोघांनीही आपल्या अफेरबाबत सर्वांसमोर मान्य केलं होतं. त्यानंतर पुढे सिमी ग्रेवालने रतन टाटांशी ब्रेकअप झाल्यानंतर रवी मोहन यांच्याशी विवाह करून नव्या आयुष्याची सुरुवात केली. तसेच त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, रतन टाटा एक परफेक्ट जंटलमन आहेत, ते खूप विनम्र आहेत आणि त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर खूप चांगला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT