Navneet Rana and Ravi Rana Sarkarnama
मुंबई

मोठी घडामोड : राणा दांपत्याला रातोरात पोलिसांनी दुसरीकडं हलवलं

उद्धव ठाकरेंच्या दबावामुळेच पोलिसांनी दुसरीकडे हलवल्याचा राणा दांपत्याचा आरोप

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठणाचा राणा दांपत्यानं इशारा दिल्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला होता. अखेर खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक केली आहे. त्यांना भेटायला गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्ला झाला होता. यानंतर काल (ता.23) मध्यरात्रीच पोलिसांनी राणा दांपत्याला दुसरीकडे हलवले आहे.

राणा दांपत्याला खारघर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. परंतु, खार पोलीस ठाण्यासमोरच सोमय्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने मध्यरात्रीच पोलिसांनी राणा दांपत्याला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हलवलं. यावर राणा दांपत्यानं मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवलं आहे. पोलीस हे मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करीत असून, त्यांच्या सांगण्यानुसार आम्हाला दुसरीकडं हलवण्यात येत आहे, असा आरोप राणा दांपत्यानं केला आहे.

राणा दांपत्याला अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राणा दांपत्याला खार पोलीस ठाण्यात भेटायला गेलेल्या सोमय्यांच्या गाडीवर काल रात्री दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे, सोमय्यांना झेड प्लस सुरक्षा असतानाही हा हल्ला झाला आहे. सोमय्या हे यात जखमी झाले आहेत. सोमय्यांनी या प्रकरणी शिवसैनिकांकडे बोट दाखवलं आहे. तर सोमय्यांनी अंगावर गाडी घातल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. याबाबत सोमय्या म्हणाले की, मी जखमी असून, माझ्या कारमध्ये बसून आहे. माफिया सेनेच्या गुंडावर पोलीस कारवाई करीत नाहीत, तोपर्यंत मी वांद्रे पोलीस ठाण्यासमोर कारमध्येच बसून राहणार आहे.

खार येथील राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी काल मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. बाहेर शिवसैनिक हे राणा दांपत्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांची माफी मागावी, अशी मागणी करत होते. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून तणावाचे वातावरण बनत चालेले होते. अखेर पोलिसांनी सुरक्षितपणे त्यांना घराबाहेर काढून त्यांना खार पोलीस ठाण्यात नेले. नंतर त्यांना अटक करण्यात आली. राणा दांपत्यावर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी कलम १५३ अ लावण्यात आलं आहे. हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. यामुळं राणा दांत्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT