PWD Minister Ravindra Chavan News Sarkarnama
मुंबई

Ravindra Chavan : कोकणात दोस्तीत कुस्ती, शिवसेनेच्या 'या' मतदारसंघावर भाजपचा डोळा!

Roshan More

Mumbai : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असताना महायुतीमध्ये भाजपने शिवसेनेच्या (शिंदे गट) मतदारसंघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असतो. सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत सिंधुदुर्गचे खासदार आहेत. त्यामुळे तो मतदारसंघ महायुतीत शिंदे गटाला मिळेल, असे म्हटले जात होते. मात्र, भाजपने आपल्या मंत्र्याला या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत भाजप आहेत.शिंदे गटाकडून यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र, सलग दोन वेळा विनायक राऊत येथून निवडून आले आहेत. ते ठाकरे गटात आहेत. त्यामुळे येथे शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना होण्याची शक्यता होती. मात्र, भाजपने या मतदारसंघावर दावा करत विनायक राऊत यांच्या विरोधात रवींद्र चव्हाण यांना उभे करण्याचे संकेत दिले आहेत.

शिवसेनेकडून किरण सामंत तयारी करत असतानाच भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठांनी तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. कल्याण मतदारासंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. या जागेवर आधी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दावा केला जात होता. रवींद्र चव्हाण हे येथून लढतील, अशी शक्यता सांगितली जात होती. मात्र, चव्हाण यांनीच ते कल्याणमधून लढणार नसल्याचे स्पष्ट करून चर्चांना पूर्णविराम दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत वादाची शक्यता

शिवसेनेकडून किरण सामंत तयारी लागले होते. किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळेल, अशी त्यांची आशा होती. पण, आता अचानक भाजपचे रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आल्याने या जागेवर तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. कोकणात शिवसेनेची ताकद असताना ही जागा भाजपला सोडण्यावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT