BJP banner in Dombivli highlighting Ravindra Chavan and targeting Eknath Shinde sparks fresh political controversy. sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Vs BJP : युतीची चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदेंना डिवचले; भाजपच्या 'त्या' बॅनरमुळे सत्तासंघर्ष उघड!

BJP Ravindra Chavan Dombivli Politics : महापालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यक्रमात लावलेल्या एका बॅनरमुळे वेगळीच चर्चा रंगली आहे.

शर्मिला वाळुंज

Dombivli Politics : कल्याण-डोंबिवलीसह राज्यातील महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये दोन्ही पक्षात सुरू असलेला सत्तासंघर्ष थांबल्याची चर्चा होती. मात्र, एका बॅनरमुळे हा सत्तासंघर्ष थांबला नसल्याची चर्चा आहे.

बॅनरवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा फोटो आणि त्यावर लावण्यात असलेल्या मजकुराने शिंदेंना डिवचल्याची चर्चा आहे. या बॅनरवर ''इस बार जवाब ही ऐसा देंगे, फिर कभी सवाल ही नही उठेगा...'' असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

बॅनरवर अधिकृतपणे कोणाचे नाव नाही तर सत्ताधारी पक्षातील मित्रपक्षालाचा हा इशारा वजा संदेश आहे का ? यावरुन राजकीय गोटात कुजबुज सुरु आहे. कल्याण डोंबिवलीतील राजकारण पाहता मित्रपक्ष असलेले भाजपा आणि शिवसेना यांच्यात राजकीय सुत असले तरी अंतर्गत कोल्डवॉर काही संपण्याची चिन्हे दिसत नाही.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्यात विशेषतः कल्याण डोंबिवली मध्ये भाजपाची मोठी कोंडी करण्यात आली होती. शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आणि भाजपाचे डोंबिवली विधानसभेचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्यातील शितयुद्ध लोकसभा, विधानसभेला उघड उघड दिसून आले. आता केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता असून चव्हाण यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद आले आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला कोंडीत पकडण्यास भाजपाने सुरुवात केली आहे.

युती होणार नसल्याची कुजबूज

राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती सत्ताधारी पक्षांकडून देण्यात आली आहे. त्यात कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये ही भाजप व शिंदे गटाची शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे, दोन्ही पक्षांतील माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते मात्र खाजगीत “युती होणार नाही” अशीच चर्चा करताना दिसत आहेत. अनेकांनी आपापले स्वतंत्र पॅनल तयार करत कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले आहे.

भाजप उपाध्यक्षाच्या कार्यक्रमात बॅनर

भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी भोपर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचा एक बॅनर लावला आहे. या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. कार्यक्रमापेक्षा बॅनरवरील संदेशाची चर्चाच अधिक रंगली होती. या बॅनरवरी “इस बार जवाब ही ऐसा देंगे, फिर कभी सवाल ही नही उठेगा..!” हा मजकूर नेमका कुणासाठी? विरोधकांसाठी की महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटासाठी आहे अशी हळुच कुजबुज सुरु आहे. युती होणार असल्याचे वरिष्ठ नेते जरी सांगत असले, तरी कल्याण डोंबिवली मात्र दोन्ही पक्षातील कोल्ड वॉर संपलेले नसल्याचे हे बॅनरच सूचित करत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT