Devendra Fadnavis-Chandrashekhar Bawankule  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News: राजीनाम्याचा सस्पेन्स कायम...; भाषणातच फडणवीसांनी बावनकुळेंची 'ती' मागणी फेटाळली

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभेचा निकाल लागला आणि सगळी गणितं उलटी फिरली. मतदानाआधी,नंतर, एक्झिट पोल अशा सगळ्यात महाविकास आघाडीपेक्षा महायुती पुढे असल्याचे दाखवण्यात आले. पण प्रत्यक्ष निकालात उलटंच घडलं आणि अनपेक्षितपणे महायुतीसह भाजपचा सुपडासाफ झाला. महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंकत महायुतीचा धुव्वा उडवला.

निकालाआधी जे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महायुती 35 ते 40 जागा जिंकेल असा दावा करत होते, त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली. या निकालातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी घेत फडणवीस यांनी थेट मला सरकारमधून मोकळं करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना करणार असल्याचे सांगत मंत्रि‍पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. यामुळे युतीसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण फडणवीसांभोवतीच फिरत राहिले.

दिल्लीवारी, अमित शाहांसोबतची भेट, चर्चा यामुळे महाराष्ट्रात उलटसुलट चर्चांना उधाण आले. पण आज तेच फडणवीस दोन तीन दिवसांच्या राजकीय घडामोडींनंतर भाजप आमदारांसमोर परतले. नुसते परतलेच नाही तर त्यांनी आपण कुठे कमी पडलो हे सांगतानाच प्लसपॉइंटही ठळकपणे मांडले.लोकसभेतील पराभवाने खचलेल्या भाजप पदाधिकारी- कार्यकर्त्यांमध्ये हुंकार भरला.पण याचवेळी त्यांनी आपल्या सरकारमधून मोकळं करण्याच्या निर्णयाबाबतचा सस्पेन्सही कायम ठेवला.

फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच...

मुंबईत झालेल्या भाजपच्या आढावा बैठकीत नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी तडफदार भाषण केले. पण या भाषणावेळी एका प्रसंगाची मोठी चर्चा झाली. फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांना मध्येच टोकलं.

बावनकुळे यांनी फडणवीसांना उद्देशून 'भाषण करा,पण आम्ही जो प्रस्ताव मांडला आहे त्यावर पहिल्यांदा उत्तर द्यावं अशी मागणी केली.तेव्हा अचानक आलेल्या या बावनकुळेंच्या बॉम्बवर फडणवीस यांनी थांबा जरा थांबा...योग्यवेळी योग्य गोष्टी करु' असं सांगत वेळ मारुन नेली. तसेच सरकारमधून मुक्त होण्याच्या आपल्या निर्णयासंदर्भातला सस्पेन्सही कायम राखला.

आजच्या भाषणात देवेंद्र फडणवीसांचा तोच आत्मविश्वास, तीच जिगरबाज वृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली.कार्यकर्त्यांमध्ये जोश भरतानाही त्यांनी पराभवाची कारणमीमांसाही केली. ते म्हणाले, महाराष्ट्रातून उद्योग पळवले,महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रात काही नरेटिव्ह सातत्याने मांडण्यात आले. त्यात संविधान बदलण्यात येणार,मराठा आरक्षण,उद्योगधंदे राज्याबाहेर नेण्यात आले अशा काही मुद्द्यांचा दाखलाही त्यांनी दिला. याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे, असा नरेटिव्ह तयार केल्याचेही सांगण्यात आले.

पण जर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मुंबई आणि कोकणात असती तर दिसायला पाहिजे होती. ठाण्यापासून कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा आली नाही. कोकणात नाही, पालघर नाही, ठाणे जिल्ह्यात नाही, रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड या भागात उबाठाला एकही जागा मिळालेली नसल्याचा दावाही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT