Pratap Sarnaik, Rohit Pawar  Sarkarnama
मुंबई

Maharashtra State Assembly: T20 च्या पोस्टरबाजीवरून रोहित पवार-सरनाईकांमध्ये जुंपली; सत्ताधारी-विरोधक येणार आमने सामने

Pradeep Pendhare

T20 चा वर्ल्डकप जिंकल्यानंतर काल मुंबई जल्लोष करण्यात आला. मात्र राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. आमदार रोहित पवार आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यामध्ये जुंपली आहे.

विधिमंडळ परिसरात सत्ताधाऱ्यांनी श्रेय घेण्यासाठी टीम इंडियाचे फोटो दाखवत स्वतःचेही फोटो लावलेत,असा आरोप आमदार पवारांनी केला, तर आमदार सरनाईक यांनी रोहित पवार आत्ताच राजकारणामध्ये सक्रिय झाले आहेत. त्यांना क्रिकेट विश्वाची कल्पनाही तरी आहे का? असा सवाल सरनाईक यांनी केला.

T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया भारतात आली. मुंबईत काल जल्लोष रॅली काढण्यात आली होती. रॅलीमध्ये सत्ताधारी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीम इंडियाचे स्वागत केले.

मुंबईत सर्वत्र टीम इंडियाच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. विधिमंडळ अधिवेशन काळात आज सायंकाळी 4 वाजता टीम इंडियातील प्रमुख चार खेळाडू येणार आहेत. त्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून तयारी करण्यात आली आहे.

विधिमंडळ इमारत परिसरामध्ये टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो वापरून आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वागताचे फलक जागोजागी लावले आहेत. यावरून विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे.

आमदार रोहित पवार यांनी या फलकाचा फोटो दाखवत सत्ताधारी यांना फलकबाजी करण्यातच जास्त इंटरेस्ट आहे. टीम इंडिया ही सर्वांची आहे, देशाची आहे. त्यामुळे स्वतःचे फलक लावण्यात सत्ताधाऱ्यांनी समाधान मानले. टीम इंडियाचे फोटो वापरून खाली सत्ताधारी आणि विरोधकांचे नाव वापरले असते, तर अधिक चांगला संदेश गेला आसता. परंतु सत्ताधाऱ्यांना फलकबाजी करण्यातच आनंद वाटतो, असा टोला लगावला.

सत्ताधारी आमदाराने अशा पद्धतीने पोस्टर लावले आहेत, की त्या पोस्टरवरून इंडियन टीमच गायब आहे.'लाडकी बहीण' पोस्टरवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या आमदारांचे फोटो लावले आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची सवय सत्ताधाऱ्यांना लागली आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी रोहित पवार यांनी केलेल्या आरोपाची चांगलीच फिरकी घेतली. रोहित पवार आता राजकारणामध्ये सक्रिय झाले आहे. क्रिकेटचं नॉलेज, अजून आलेला नाही. आम्ही सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने टीम इंडिया मुंबई आली. या टीम इंडियाचे सर्वांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.

मुंबईकरांनी देखील टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत केले. पाच ते सहा लाखाची गर्दी होती ते पाहूनच विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. यातून त्यांना नैराश्य आले असून उटसुट कसलेही आरोप करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला टीम इंडियाच्या जल्लोष रॅली गुजरातच्या बस असतील, असा आरोप करण्यात आला.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासह प्रमुख चार खेळाडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आज सायंकाळी 4 वाजता येत आहेत. त्यानंतर ते विधिमंडळात येतील. हा ऐतिहासिक क्षण पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडत आहे. या खेळाडूंच्या स्वागतासाठी विधिमंडळातील प्रत्येक आमदार उपस्थित राहणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT