मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) आज पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. परमबीरसिंह यांनी देशमुखांवर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर आज वाझेची उलट तपासणी झाली.
चांदीवाल समितीसमोर वाझे याची आज उलटतपासणी घेण्यात आली. देशमुखांच्या वकिलांकडून ही उलटतपासणी झाली. यात वाझे म्हणाला की, एनआयएने 13 मार्चला अटक केल्यानंतर माझ्यावर दबाव टाकला होता. तो माझ्या आयुष्यातला कठीण काळ होता. मी मानसिक तणावाखाली होतो. एनआयएकडून माझा 28 दिवस छळ सुरू होता. यानंतर मी याबाबत 3 मे रोजी एनआयए न्यायालयात विनंतीही केली होती. एनआयएने माझ्याकडून अनेक कागदांवर जबरदस्ती सह्या घेतल्या परंतु, त्यांच्या प्रती मला देण्यात आल्या नाहीत.
चांदीवाल समितीने देशमुखांना हजर करावे, अस वॉरंट सोमवारी बजावले होते. देशमुख यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली असून, ते सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. आज ते आयोगासमोर हजर झाले. याचवेळी परमबीरसिंह आणि वाझेही समितीच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले आहेत. हे तिघेही मागील काही महिन्यांत पहिल्यांदाच समोरासमोर आले. देशमुखांनी वाझेला 100 कोटींची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप परमबीरसिंह यांनी केला आहे. त्यानंतर सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केल्याने त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यादरम्यान ईडीने देशमुखांना अटक केली. तर त्याआधीच मनसुख हिरेन व अँटिलिया स्फोटक प्रकरणात वाझेला अटक करण्यात आली होती.
परमबीरसिंह व वाझे हे दोघे 29 नोव्हेंबरला आयोगासमोर हजर झाले होते. कार्यालयाबाहेर या दोघांमध्ये काही काळ चर्चाही झाली. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. या भेटीची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, आज देशमुख, परमबीरसिंह अन् वाझे हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र आले होते. यामुळे समितीसमोर सुनावणीदरम्यान तिघे काय बोलणार, याकडे लक्ष लागले होते.
दरम्यान, परमबीरसिंह हे 29 नोव्हेंबरला चौकशीसाठी समितीसमोर हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केले. समितीसमोर सादर करण्यास माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच, कुठल्या साक्षीदाराची उलटतपासणीही मला करायची नाही, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यामुळे परमबीरसिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपातून अधिकृतरीत्या माघार घेतल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे देशमुखांना क्लिनचिटच मिळाल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.