मुंबई : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji raje) यांनी शिवबंधन बांधण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव नाकारला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अद्याप त्यावर अधिकृत घोषणा झालेली नाही. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) य़ांनीही आपला प्लान बी तयार केला असून सहाव्या जागेसाठी आता शिवसेनेच्या ग्रामीण भागातील नेत्याला राज्यसभेची उमेदवारी देण्याचे त्यांनी जवळपास निश्चित केले आहे.
आज मुंबईत दिवसभर संभाजीराजे आणि शिवसेना हाच विषय राजकीय वर्तुळात चर्चेला होता. संभाजीराजे यांच्याकडे मंत्री उदय सामंत, खासदार अनिल देसाई आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. तेथेच संभाजीराजेंना शिवसेनेत येण्याचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले. मात्र संभाजीराजेंनी लगेच होकार दिला नाही. त्यांचा नकार गृहित धरूनच शिवसेनेचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी अपक्ष आमदारांना सोबत घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे.
अपक्ष लढविण्यावर संभाजीराजे अद्याप कायम असल्याने शिवसेनेतील इतर नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यातही माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव आघाडीवर आहे. औरंगाबादमध्ये महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. मराठवाडा हा शिवसेनेसाठी महत्वाचा आहे. तेथील कबरीचा विषय आता चर्चिला आला आहे. त्यामुळे खैरे यांच्यासारखा ओबीसी चेहरा शिवसेना देऊ शकते. त्याचा उपयोग मराठवाड्यापुरता होऊ शकतो. दुसरीकडे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याही समर्थकांसाठी चांगली बातमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता आता आहे. विस्तार करण्यासाठी शिवसेनेला पुण्यात मोठे आव्हान आहे. त्या पार्श्वभूमीवर आढळरावांना खासदारकी देऊन सेना येथील कार्यकर्त्यांना ताकद देऊ शकते. संभाजीराजेंना सेनेने उमेदवारी दिली नाहीतर त्यांचे समर्थक शिवसेना ही मराठा विरोधी आहे, असा प्रचार करू शकतात. त्याला उत्तर देण्यासाठी आढळराव यांच्या नावाचा पर्याय योग्य ठरेल, असे सांगण्यात आले.
याशिवाय ठाकरे यांचे उजवे हात मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांचेही नाव चर्चेत आहे. सध्या दिल्लीत संजय राऊत हे एकहाती शिवसेनेचा किल्ला सांभाळत आहेत. त्यात आता नार्वेकर यांची भर घालून शिवसेनेचे राजधानीतील नेटवर्क अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न नार्वेकर यांच्या माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे ठाकरे यांच्या मनात ते देखील नाव घोळत असावे. परप्रांतीय आणि पक्षाशी संबंध नसणाऱ्यांना राज्यसभेची खासदारकी देण्याची शिवसेनेची आतापर्यंत परंपरा आहे. मात्र या वेळी तसे होण्याची शक्यता फेटाळण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.