Sameer Wankhede
Sameer Wankhede  Sarkarnama
मुंबई

समीर वानखेडेंना दणका : आर्यन खान प्रकरणाचा तपास एनसीबीने काढून घेतला!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास केंद्रीय अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेतला आहे. या प्रकरणाचा तपास आता मुंबई एनसीबीऐवजी दिल्ली एनसीबीचे पथक करणार आहे. त्याची जबाबदारी ही दिल्ली एनसीबीचे संजय सिंह यांच्यावर सोपविण्यात आली आहे, अशी माहिती एनसीबीच्या दक्षिण-पश्चिम विभागाचे उपमहानिदेशक मुथा अशोक जैन यांनी सांगितले. हा प्रशासकीय निर्णय आहे, असेही जैन यांनी सांगितले होते. पण, समीर वानखेडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (Sameer Wankhede withdrew the investigation into the Aryan Khan case)

दरम्यान, वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह सहा वेगवेगळ्या हायप्रोफाईल प्रकरणाचा गुन्ह्याचा तपास काढून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यात रिया चक्रवर्तीच्या केसचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील एनसीबीची एसआयटी टीम या प्रकरणांचा तपास करणार आहे.

या प्रकरणाचा तपास माझ्याकडून काढून घेण्यात यावा. तपासानंतर जो निर्णय होईल तो होईल. पण सध्यातरी तपास काढून घ्यावा, अशी मागणी मीच केंद्रीय अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडे केली होती, असा दावा यानंतर समीर वानखेडे यांनी केला आहे.

कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून मुंबई एनसीबीवर वेगवेगळे आरोप करण्यात येत होते. विशेषतः समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टीकेची झोड उठवत गंभीर आरोप केले होते. वानखेडे यांच्यावर एवढे गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्याकडेच या प्रकरणाचा तपास राहणे योग्य नाही, असे म्हणून केंद्रीय एनसीबीने हे प्रकरण वानखेडे यांच्याकडून काढून घेतल्याचे सांगितले जात आहे.

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून सोडण्यासाठी पैशाची मागणी झाल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेला आहे. तो या प्रकरणातील पंचाच्या बॉडीगार्डकडून करण्यात आला होता. काही पंचांनी तर आपल्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या हा होत्या, असा आरोप समीर वानखेडे यांच्यावर केला होता. समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक आणि इतरांकडून झालेले आरोप पाहून त्यांच्याकडून आर्यन खानसह एकूण सहा प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे, त्यामुळे वानखेडे यांना धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT