Sanjay Dina Patil | Eknath Shinde Shiv Sena | Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Shivsena UBT Crisis : "उद्धव ठाकरेंनी माझ्यासमोर हात जोडले होते..."; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच 'या' खासदाराचा खळबळजनक दावा

MP Sanjay Dina Patil joins Eknath Shinde's Shivsena : "माझं ठाकरेंच्या कार्यकर्त्यांशी कोणतंही वैर नाही, त्यांच्यामुळे मी खासदार झालो आहे. पण कोणी माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांनी स्वत:चा लाईफ इन्शुरन्स काढून ठेवावा. माझ्या नादाला लागाल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये नाहीतर स्मशानात जाल.''

Jagdish Patil

Mumbai News, 23 Jun : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले खासदार संजय दिना पाटील यांनी सोमवारी (ता.२२) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच त्यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. "माझं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी कोणतंही वैर नाही, त्यांच्यामुळे मी खासदार झालो आहे. पण कोणी माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांनी स्वत:चा लाईफ इन्शुरन्स काढून ठेवावा. माझ्या नादाला लागाल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये नाहीतर स्मशानात जाल', अशा इशारा खासदार संजय दिना पाटील यांनी दिला आहे.

शिवाय पाटील यांनी ठाकरे गटातील एका नेत्यामुळेच मी ठाकरे गट सोडल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय या व्यक्तीने माझ्या घरासमोर येऊन शिव्या दिल्या. त्याने घरासमोर येऊन माफी मागितली तर मी मातोश्रीवर यायला तयार आहे, असं आपण उद्धव ठाकरेंना सांगितल्याच ते म्हणाले. तसंच मी विभागप्रमुख म्हणून त्याला खूप आदर दिला. त्याची कुत्र्यासारखी अवस्था आहे, तो लोकांना सर्वांदेखत शिव्या देतो.

दादा लोकांच्या जीवावर वाघ बनणं सोडून द्या. आमच्या नादाला लागाल तर घरात घुसून मारु. तुम्ही कितीही सुरक्षाव्यवस्था ठेवा, मी बॉम्ब टाकेन, असंही संजय दिना पाटील म्हणाले. दरम्यान, याचवेळी खासदार पाटील यांनी उद्धव ठाकरेंबाबत देखील मोठा दावा केला.

चक्क उद्धव ठाकरेंनी आपल्यासमोर हात जोडल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी माझ्या मुलीला महापालिका निवडणुकीत तिकीट दिलं. पण मी आणि माझी मुलगी त्यांच्याकडे तिकीट मागायला गेलो नव्हतो. ती जागा मनसेला जाऊ नये म्हणून राजुल पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली.

राजुल पाटील या माझं मतदारसंघातील काम बघत होत्या, नगरसेवकपदाच्या निवडणुकीत उभं राहायची त्यांची कोणतीही इच्छा नव्हती. मात्र, ही जागा शिवसेनेची असल्याने ती मनसेला जाऊ नये या एका कारणासाठी माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन ठाकरे गटाने ती जागा आपल्याकडे घेतली.

शिवाय मी माझ्या मुलीसाठी नव्हे तर माझ्यासोबत काम करणाऱ्या मामी मंचेकर यांच्यासाठी तिकीट मागत होतो. मामी मंचेकर यांच्यासाठी कांजूर पूर्वेच्या वॉर्डमधून तिकीट मागितले होते. मला त्यांचा एबी फॉर्म घ्यायला मातोश्रीवर बोलावलं होतं.

मात्र, त्यावेळी एक फोन आला आणि उद्धव ठाकरेंनी माझ्यासमोर हात जोडले आणि मला म्हणाले, "संजय माझी अडचण होत आहे." तेव्हा मी उद्धव ठाकरेंना म्हणालो, "साहेब तुम्ही हात जोडू नका, तुम्ही आदेश द्या.", असं मोठं वक्तव्य दिना पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT