Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut addresses the media, alleging misuse of money and power in unopposed municipal elections across Maharashtra ahead of civic polls. Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : '40 हजार कोटींचे प्रकल्प रद्द केल्यानेच शिंदेंना चाप बसला, त्यांचे प्रकल्पांचा खर्च वाढवून कमिशन खाण्याचे उद्योग फडणवीसांनी बंद केले...'

Sanjay Raut Attacks BJP and Shinde Sena : 'मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात उभा दावा आहे. अमित शहा हे शिंदे यांचे एकमेव पालनहार आहेत. कारण मुख्यमंत्री फडणवीस व अमित शहांचे संबंध बरे नाहीत हे आता जगजाहीर आहे. त्यामुळे असंख्य भ्रष्टाचार व घोटाळे करूनही शिंदे यांना अभय मिळाले आहे.'

Jagdish Patil

Mumbai News, 18 Jan : मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले आहेत. या निकालात मुंबई-ठाण्यासह राज्यातील अनेक महापालिकांवर भाजप आणि महायुतीच्या मित्रपक्षांची सत्ता आली आहे. मात्र, या निवडणुकीच्या निकालावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सामनातील सदरातून भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

तर या सर्व महापालिकांच्या निवडणुकीत हरामाचा पैसा वापरला आणि सत्तेतल्या तिन्ही पक्षांकडे हा पैसा होता. आणि याच भ्रष्ट पैशांवर भाजपने मुंबई अदानींच्या घशात घातली, अशा शब्दात राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला आहे. संजय राऊतांनी लिहिलं की, 'आतापर्यंत मुंबईत ‘ठाकऱ्यांची’ म्हणजे शिवसेनेची सत्ता होती. शिवसेनेने मुंबईला 23 महापौर दिले. हे सर्व महापौर कडवट मराठी होते.

आता ही परंपरा पुढे राखली जाईल काय? असा प्रश्न पडावा, अशा प्रकारचे निकाल मुंबईत लागले. मराठी माणूस, मराठी अस्मितेचा पराभव एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार, अमित साटम या मराठी माणसांनी घडवून आणला. पुन्हा निवडणूक आयोगाची त्यांना संपूर्ण साथ मिळाली. त्यामुळे या निवडणुका की निवडणूक आयोगाने केलेल्या नेमणुका असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रात भाजपची लहर आहे असे त्यांचे लोक सांगतात, पण ही लहर नसून सत्ता आणि भ्रष्ट पैशांचा कहर आहे.

या भ्रष्ट पैशांच्या जोरावर मुंबई ताब्यात घेण्यासाठी भाजप व मिंधे गटाने काय करायचे बाकी ठेवले? या निवडणुकीतही आयोगाने प्रचंड गोंधळ घातला. मराठी भागात मतदारांची नावे वगळली गेली. बोटावरची शाई पुसली जाईल याची व्यवस्था करण्यात आली. गणेश नाईक यांच्या सारख्या मंत्र्यांचे नावही वगळले गेले. अशा हजारो घटना होऊनही शेवटी मतदारांनी कर्तव्य बजावले. मुंबईसह 26-27 महापालिका जिंकू, असे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीआधी सांगितले. हा आत्मविश्वास आणि माज अफाट पैसा व सत्तेचा आहे,' अशा शब्दात राऊतांनी भाजप आणि शिंदेसेनेवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे बहुमत मोठे आहे. तरीही सरकारला स्थैर्य नसल्याचा दावा केला आहे. 'मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात उभा दावा आहे. अमित शहा हे शिंदे यांचे एकमेव पालनहार आहेत. कारण मुख्यमंत्री फडणवीस व अमित शहांचे संबंध बरे नाहीत हे आता जगजाहीर आहे. त्यामुळे असंख्य भ्रष्टाचार व घोटाळे करूनही शिंदे यांना अभय मिळाले आहे. तरीही शिंदे आणि अजित पवारांना उघडे पाडायची एकही संधी फडणवीस सोडत नाहीत. शिंदे यांचा भ्रष्टाचार व पैसा गोळा करण्याची ‘हवस’ किती टोकाची आहे हे फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले.

मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी जी कामे काढली ती राज्याचे आर्थिक नियोजन बिघडवणारी होती. 20 रुपयांचे काम शिंदे यांनी त्यांच्या ठेकेदारांना 100 रुपयांना दिले. त्या 80 रुपयांतले 70 रुपये शिंदे यांच्या खिशात जात राहिले. प्रकल्पांचा खर्च वाढवून कमिशन खाण्याचे उद्योग फडणवीस यांनी रद्द केले. असे किमान 40 हजार कोटींचे प्रकल्प जे शिंदे यांनी मंजूर केले ते रद्द करण्याचे पुण्य कार्य फडणवीस यांनी केले. यामुळे शिंदे यांना चाप बसला.

महापालिका निवडणुकीत शिंदे व त्यांच्या लोकांकडे ‘कॅश’ म्हणजे रोखीची चणचण भासली व फडणवीस यांना तेच हवे होते. हे खरे असले तरी मुंबईतील त्यांच्या उमेदवारांना प्रत्येकी 5 कोटी व इतर महानगरपालिकांत 2 कोटी देण्याची कामगिरी शिंदे यांच्या पक्षाने बजावली. मुख्यमंत्र्यांनी 40 हजार कोटींची कामे थांबवली ही शिंदे यांच्या आर्थिक उलाढालीतील लहान घटना आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही आता अमली पदार्थांच्या व्यवहाराचा पैसा पसरला आहे. याच पैशांनी ‘मतदार’ विकत घेतला जातो. हे सर्व भयंकर आहे. नशेच्या गोळ्या व नशेचा पैसा सत्ताधारी घरापर्यंत पोहोचवत आहेत. मग आता राहिले काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

तर राज ठाकरे यांनी अदानी यांनी व्यापलेला भारताचा व महाराष्ट्राचा नकाशा समोर आणला. भारताच्या संपूर्ण नकाशाचे मालक अदानी झाले. भारताचा मोठा भूभाग आधी चीनने गिळला व भारतांतर्गत गौतम अदानी यांनी मोक्याचा भूभाग व सार्वजनिक संपत्ती गिळली हे स्पष्ट दिसते. चीनने भारताच्या सीमा अरुणाचल प्रदेशपासून लडाखपर्यंत गिळल्या. त्यांची घुसखोरी सुरूच आहे, पण चीनच्या एका शिष्टमंडळासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्लीच्या कार्यालयात पायघड्या अंथरल्या. हे ढोंग आहे. अदानी यांचे साम्राज्य मागच्या दहा वर्षांत फक्त नरेंद्र मोदींमुळे उभे राहिले.

जनतेच्या पैशांवर मोदी आपले मित्र अदानींचे साम्राज्य वाढवत आहेत. हा इतिहासातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे युतीच्या विरोधात हाच भ्रष्टाचाराचा पैसा खेळतो आहे. धारावीपासून इतर अनेक जमिनी ताब्यात राहाव्यात म्हणून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न अदानींचे लोक करत राहिले व त्या जाळ्यात काही जण फसले. गौतम अदानी यांनी मराठी एकजुटीचा पराभव होण्यासाठी पूर्ण ताकद मुंबईत लावली. भाजपला सत्ता मिळावी व मुंबई आपल्या ताब्यात यावी हे अदानींचे स्वप्न. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मराठी माणसाने मुंबईत अदानींचा पाया भक्कम करण्यासाठी स्वाभिमान दिल्लीच्या दारात गहाण ठेवला हे इतिहासात नोंदले जाईल, असं लिहित राऊतांनी अदानी आणि शिंदे भाजपवर टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT