

Mumbai Mayor post : मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचा उमेदवार बसणार असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे. एकनाथ शिंदे यांनी यासाठी भाजपवर दबाव वाढवला आहे.
मुंबईचे महापौरपद शिवसेनेला मिळावं, असा आग्रह एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे धरल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी यातूनच आपले नगरसेवक मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये ठेवल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
गेली 25 वर्षे शिवसेनेचा मुंबईत महापौर होता. शिवसेना फुटीनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश आलं नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि मनसे (MNS), ठाकरे बंधू एकत्र येऊन देखील बहुमत मिळालं नाही. भाजपला एकट्या देखील बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही.
भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना युतीत लढली. त्यामुळे युतीचा महापौर असे सांगितले जात आहे. परंतु युतीपैकी शिवसेना की, भाजप याची चर्चा सुरू असतानाच, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तिरकी चाल करत, महापौरपदासाठी भाजपवर दबाव वाढवल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही शिवसेनेला मुंबईत अपेक्षित यश न मिळाल्याचे सर्वाधिक खापर एकनाथ शिंदे यांच्या बंडवर फोडले जात आहे. ही चर्चा रोखण्यासाठी, शिंदेंनी भाजपकडे शिवसेनेसाठी मुंबईच्या महापौर पदाचा आग्रह धरल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
मुंबई महापालिकेत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. असे असले तरी, भाजपचे मुंबईतील महापौरपदाचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. मुंबईचे महापौरपद शिवसेनेला मिळावे, यासाठी एकनाथ शिंदे यांनी भाजपवर दबाव वाढवला आहे. शिंदेंनी आपले 29 नगरसेवक निवडीनंतर ताज लँड्स एंडमध्ये ठेवले आहेत, हे त्यातूनच ठेवला आहे. उद्धव ठाकरेंपेक्षा भाजपच, शिवसेनेचे नगरसेवक फोडू शकते, ही शक्यता जास्त असल्याने एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्याच नेत्यांमध्ये चर्चा आहे. मात्र या नगरसेवकांना मार्गदर्शनासाठी ताज लँड्स एंडमध्ये ठेवण्यात आल्याचं स्पष्टीकरण पक्षाकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून अशा काळात शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळत नसेल, तर किमान मुंबईचे महापौरपद, तरी मिळावे यासाठी एकनाथ शिंदे अडून बसले आहे. पहिली अडीच वर्षे शिवसेनेकडे महापौरपद राहावे, असा शिंदेंनी भाजपकडे आग्रह धरला आहे. यातून भाजप अन् एकनाथ शिंदे शिवसेनेत राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.
याशिवाय समाज माध्यमांवर एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपबरोबर युती तोडावी, अशी घोषणाबाजी केल्याची चर्चा आहे. तसे समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामुळे भाजप अन् एकनाथ शिंदे शिवसेना युतीच्या भवितव्यावर देखील चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. भाजपला मुंबईत सत्तास्थापनेसाठी आणि महापौरपदासाठी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 29 नगरसेवकांचे बळ आवश्यक आहे. शिवसेना किंवा भाजपचा महापौर जरी झाल्या, या युतीत नेहमीच संघर्ष राहिल असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत देवाची इच्छा असेल, तर नक्कीच शिवसेनेचा महापौर होईल, असे विधान केले होते. या विधानाचे अनेक अर्थ आता निघू लागले आहेत. एकनाथ शिंदे ठाकरेंचा हा शब्द खरा करणार की, भाजप शिंदेंच्या मनसुब्यांवर पाणी फिरवणार, याची उत्सुकता आहे.
गेल्या 25 ते 30 वर्षाच्या संघर्षानंतर मुंबईत भाजपला 89 जागा, हे मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे भाजप देखील सहाजासहजी महापौरपदावरील दावा सोडणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेना अन् भाजपचा संघर्ष अटळ आहे, असे दिसते. या संघर्षात एकनाथ शिंदे बलाढ्य झालेल्या भाजपसमोर कितपत टिकाव धरणार हे पाहण्याचं उत्सुकतेचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.