Sanjay Raut Book | Raj Thackeray | Bodh Kirtan Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : बाळासाहेब ठाकरे राऊतांना शिव्या द्यायचे; पण 'त्या' एका गोष्टीमुळे थेट संपादक बनवलं : राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा

Raj Thackeray on Sanjay Raut : राज ठाकरे यांनी म्हणाले, "बाळासाहेब ठाकरेंना संजय राऊत अजिबात आवडत नव्हते. ते राऊतांना शिव्या द्यायचे. मात्र, काही दिवसांनी त्याच राऊतांकडे 'सामना'च्या संपादकपदाची जबाबदारी देण्यात आली." ती का देण्यात आली, याचाही किस्सा राज यांनी सांगितला.

Jagdish Patil

Mumbai News, 01 Nov : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता. ३१) झाले. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत हे 'सामना'चे संपादक कसे झाले, याचा किस्सा सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

राज ठाकरे यांनी म्हणाले, "बाळासाहेब ठाकरेंना संजय राऊत अजिबात आवडत नव्हते. ते राऊतांना शिव्या द्यायचे. मात्र, काही दिवसांनी त्याच राऊतांकडे 'सामना'च्या संपादकपदाची जबाबदारी देण्यात आली." ती का देण्यात आली, याचाही किस्सा राज यांनी सांगितला.

ते म्हणाले, "संजय राऊत यांना 'लोकप्रभा'साठी बाळासाहेबांची मुलाखत घ्यायची होती. त्यासाठी मी बाळासाहेबांशी बोलावे, अशी विनंती राऊतांनी केली. त्यावर मी त्यांना 'बघतो', असे सांगितले. त्यानंतर मी बाळासाहेब ठाकरेंना संजय राऊतांना तुमची मुलाखत हवी असल्याचे सांगितले. त्यावर ते चांगलेच संतापले, कारण संजय राऊत बाळासाहेबांना आवडत नव्हते. त्यांनी राऊतांचे नाव ऐकताच शिव्या दिल्या.

मात्र, मी दोन-तीन वेळा विचारल्यानंतर बाळासाहेबांनी राऊतांना मुलाखत दिली. त्या मुलाखतीत राऊतांनी बाळासाहेबांना काही वेडेवाकडे प्रश्न विचारले. त्यामुळे सुरू असलेल्या मुलाखतीतच बाळासाहेबांनी राऊतांना शिव्या दिल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी ती मुलाखत बाळासाहेबांनी दिलेल्या शिव्यांसह छापून आली. हे पाहून बाळासाहेबांना राऊतांमध्ये काहीतरी दम आहे, असे वाटले. त्यानंतर त्यांनी संजय राऊतांची 'दैनिक सामना'च्या संपादकपदी निवड केली," असा किस्सा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितला.

शिवाय याच भाषणात राज यांनी सांगितलं की संजय राऊतांना देखील सुरूवातीला सामना वृत्तपत्र आवडत नव्हतं. ते अनेकदा "हा कसला सामना? बाळासाहेबांच्या पत्राला ही भाषा शोभते का?" असं म्हणायचे असंही राज यांनी सांगितलं.

दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी राऊतांच्या 'बोध कीर्तन' या पुस्तकातील आशयाचे आणि त्यांच्या लेखनशैलीचे कौतुक केले. शिवाय, पूर्वी अंडरवर्ल्डवर प्रभावी लिखाण करणाऱ्या संजय राऊत यांचा प्रवास पोलीस अधिकारी जयप्रकाश बोधनकर यांच्यापासून आजच्या 'बोध कीर्तन'पर्यंत पोहोचला, असे राज ठाकरे म्हणाले.

तसेच, 'बोध कीर्तन' हे पुस्तक उत्तम झाले आहे. त्यात बोध देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. अशी पुस्तके तुरुंगात राहूनच निर्माण होतात, असे संजय राऊत यांनी सांगितले. त्यांच्याकडून अशी अनेक पुस्तके निर्माण व्हावीत; मात्र ती तुरुंगाबाहेर राहून, अशी मिश्किल टिप्पणीही राज ठाकरे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT