Sanjay Raut Attack On KCR : तेलंगाणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या बीआरएस पक्षाचा महाराष्ट्रात झंझावात सुरू झाला आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील बीआरएसच्या सभा गाजल्या. येथून राव यांनी 'अब की बार किसान सरकार' अशी घोषणा दिली. यानंतर राज्यभर या आशयाचे फलक लागलेले दिसून येत आहेत. त्यातच बीआरएसमध्ये राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. आता राव दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यासाठी त्यांचा ताफा हैदराबादहून रवाना झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसीआर यांच्यावर सडकून टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, "केसीआर यांची नियत चांगली नाही. त्यांनी ठरवायला हवे की कुणाला मदत करायला पाहिजे. ते एकीकडे म्हणतात की देशात हुकुमशाही आहे. मोदी सरकार आम्हाला राज्यात काम करू देत नाही. आमच्या नेत्यांवर ईडी, सीबीआयच्या धाडी पडतात. त्यांच्या मुलीची चौकशी केली. आता एकत्र येऊन लढायचे की त्यांना मदत होईल असे राजकारण करायचे? आम्ही हुकुमशाहीविरोधात लढतो आहोत. मात्र ते नव्हते." (Latest Political Marathi News)
केसीआर यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहनही राऊत यांनी यावेळी केले. ते म्हणाले, केसीआर यांचा काँग्रेसला विरोध आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे. राज्याराज्यात राजकीय स्थिती वेगळी असते. तेलंगणात केसीआर यांना भाजपचा विरोध नाही. तर तेथे त्यांच्यापुढे काँग्रेसचे आव्हान आहे. यातून भाजपने दाबावाचे राजकारण सुरू केले असेल तर हे धोकादायक आहे."
अजित पवार यांनी बीआरएसचा भाजपची 'बी टीम' असा उल्लेख केला होता. यावर राऊत यांनी सहमती दर्शवली. ते म्हणाले, भाजचे विरोधक म्हणवून घेणाऱ्या केसीआर यांनी महाराष्ट्रात येण्यापूर्वी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. येथील राजकारण समजावून घ्यायला हवे होते. मात्र त्यांनी सरळ 'बीआरएस' घुसवण्याचा प्रयत्न केला. जे 'एमआयएम'ने केले तेच केसीआर करतात."
केसीआर महाराष्ट्रात येण्यामागे मोठ कारस्थान असल्याचा संशयही यावेळी राऊत यांनी व्यक्त केला. राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्षाने सोडलेले मोहरे किंवा घोडे यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना किती मते पडतील या पुढचा प्रश्न आहे. त्यांची आर्थिक ताकद मोठी आहे. त्यांनी राज्यात पैशांचा खेळ सुरू केला आहे. लोक फोडणे, पैसे वाटले प्रसिद्धी यंत्राचा सर्रास वापरले जात आहे. त्यांचा उद्देश जिंकणे नसून कुणाला तरी त्रास देणे आहे. कुणाची तरी मत विभाजन करणे हे आता स्पष्ट दिसत आहे."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.