Tukaram Mundhe response to Sanjay Raut on FDA allegations Sarkarnama
मुंबई

Tukaram Mundhe : राऊतांनी FDA अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांना तुकाराम मुंढेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, "त्यांचे पत्रच मिळालं नाही, आरोप प्रसारमाध्यमांमधून..."

Tukaram Mundhe response to Sanjay Raut on FDA allegations : एफडीएतील पदनिर्देशित अधिकारी आणि अन्न सुरक्षा अधिकारी हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्विक कॉमर्स कंपन्यांना परवाना निलंबित करण्याची धमकी देत पैसे मागत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून केला होता.

Jagdish Patil

Mumbai News, 29 Sep : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांवर ठाकरेंच्या नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर आता FDA आयुक्त मुंढे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एफडीएचे अधिकारी हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्विक कॉमर्स व्यावसायिकांकडून परवाना निलंबित करण्याची धमकी देत पैसे उकळत असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. मात्र, हे आरोप सर्वसाधारण स्वरूपाचे असून त्यात ठोस तपशील नसल्याचं मुंढे यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून एफडीएच्या कारवाईच्या नावाखाली व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली होत असल्याचा आरोप केला होता. एफडीएतील पदनिर्देशित अधिकारी, सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकारी हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्विक कॉमर्स कंपन्यांना परवाना निलंबित करण्याची धमकी देत पैसे मागत असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

राऊत यांनी आपल्या पत्रात, हॉटेल व्यावसायिकांना धमकावून आणि ब्लॅकमेल करून पैसे गोळा करण्याचा प्रकार पूर्वीपेक्षा अधिक वाढल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या दाव्यानुसार, तुकाराम मुंढे एफडीए आयुक्त होण्यापूर्वी क्लोजिंग नोटिससाठी १० ते १२ हजार रुपये घेतले जात असल्याचं सांगितलं जात होतं.

मात्र, मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा दर ७५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत वाढल्याचा आरोपही राऊतांनी केला. राऊत यांनी एफडीएच्या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचाही दावा केला होता. या परिस्थितीचा गैरफायदा एफडीएतील काही अधिकारी घेत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

‘मला राऊतांच्या पत्राची प्रत मिळालेली नाही’

या आरोपांवर तुकाराम मुंढे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना मुंढे यांनी संजय राऊत यांचं पत्र आपल्याला मिळालं नसल्याचं सांगितलं. राऊत यांनी केलेल्या आरोपांबाबतची माहिती आपल्याला प्रसारमाध्यमांमधूनच मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

जर संजय राऊत यांच्याकडे एफडीए अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्याचे किंवा पैसे घेतल्याचे ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते आपल्यासोबत किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) द्यावेत, असं आवाहन मुंढे यांनी केलं. ज्या व्यावसायिकांकडे पैशांची मागणी करण्यात आली आहे किंवा ज्यांनी पैसे दिले आहेत, त्यांनी संबंधित अधिकाऱ्याचं नाव आणि व्यवहाराचा तपशील देऊन आपल्याशी संपर्क साधावा, असंही मुंढे यांनी म्हटलं.

‘तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाईल’

एफडीए अधिकाऱ्याविरोधात तक्रार केल्यास भविष्यात आणखी त्रास होण्याची भीती व्यावसायिकांमध्ये असल्याबाबतही मुंढे यांना विचारण्यात आलं. यावर तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाते, असं त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या तक्रार पोर्टलवर तक्रारदाराचं नाव लपवून ठेवलं जातं. त्यामुळे तक्रार कोणी केली हे संबंधित अधिकाऱ्यांना कळत नाही. त्याचप्रमाणे, व्यावसायिकांनी थेट आपल्याशी संपर्क साधला तरी त्यांची ओळख अधिकाऱ्यांसमोर उघड केली जाणार नाही, असं मुंढे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT