Mumbai News: महायुती सरकारचे खातेवाटप झाले आता पालकमंत्री पदावरुन चढाओढ सुरु आहे. यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री होऊ इच्छिणाऱ्यांना टोला लगावला आहे. पालकमंत्र्यांचे नेमकं काम काय असतं , असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. 'मलई' मिळण्यासाठी हा सारा खटाटोप असल्याचे राऊत म्हणाले.
महायुतीतील सर्व जण सत्तेसाठी एकत्र आले आहेत, 'मलईदार'खाते मिळण्यासाठी ते एकत्र येत आहे. काहींना कायमचे पालकमंत्री हवे आहे, असा टोला राऊतांनी कुणाचेही नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. गडचिरोलीचे पालकमंत्री काय नक्षलवाद्यांच्या खात्मा करतात का? मलिदा मिळावा, यासाठी हे सारं सुरू असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
गडचिरोली, चंद्रपूर परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. त्यातून आपल्याला लाभ व्हावा यासाठी तेथील पालकमंत्र्याच्या पदावरून वाद सुरू असल्याचे दिसते. मुंबईचा पालकमंत्रीपद मंगल प्रभात लोढा किंवा अन्य कुणाला मिळाल्यास मुंबईतील मराठी माणसांना स्वस्तात घर मिळणार आहेत का? गृहनिर्माण खातं हे उपमुख्यमंत्र्यांकडे आहे. काय सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी आहे की बिल्डरांच्या हे तपासले पाहिजेत. अनेक प्रश्न सर्वसामान्यांचे आहे ते त्यातून सुटणार आहेत का? बीडचा पालकमंत्री कुणी होऊ द्या !संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते रविवारी दादरला एका कौंटुबिक सोहळ्यास एकत्र आले. या भेटीवर राऊतांना विचारले असता ते म्हणाले, "राज-उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या भेटीवर चर्चा सुरु आहे. मी राज ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या कुटुंबाशी माझा निकटचे नाते राहिले आहे. उद्धवजीही मोठ्या भावाप्रमाणे आहे, हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राला निश्चितच आनंद होईल,"
महाराष्ट्रातील जनतेचे ठाकरे कुटुंबावर प्रेम आहे, त्यादृष्टीकोनातून महाराष्ट्रातील जनता या घटनेकडे पाहत असते, दोन्ही नेत्यांचे पक्ष वेगळे आहेत. कुटुंब म्हणून आम्ही कायम एक आहोत. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांचे ऑयडॉल आहेत. तसे आमच्या पक्षाचे नाही, असा टोला राऊतांनी राज ठाकरे यांना लगावला.