NCP News: शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य अन् एकीकरणाची चर्चा

Sharad Pawar Ajit Pawar will come together : दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांनी एकत्र यावे, अशा भावनाही व्यक्त करण्यात आल्या आहेत, या एकत्रीकरणाला प्रमुख नेत्यांनी दुजोरा दिला नसला तरीही एकत्र येऊच नये, अशीही भूमिका कोणी घेतलेली दिसत नाही.
Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

सदानंद पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८५ वा वाढदिवस राज्याच्या राजकारणात वादळी ठरला तो त्यांच्या पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांच्या आणि अमित शाह यांच्या कथित भेटीमुळे. पवारांना कात्रजचा घाट दाखवून भाजपच्या छावणीत दाखल झालेल्या सहकाऱ्यांनी विधानसभेत पवार यांच्या पक्षाचे पानिपत केले. पण त्यानंतर लगेचच पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली. या वाढदिवसाचे पडसाद आता राज्य आणि देशाच्या राजकारणात दीर्घकाळ उमटणार हे मात्र निश्चित.

नवी दिल्लीत शरद पवार यांच्या वाढदिवसाला दुसऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या कुटुंबीयांसह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या मनमोकळ्या गप्पा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातूनच दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांनी एकत्र यावे, अशा भावनाही व्यक्त करण्यात आल्या, त्याला अनेकांनी फोडणी दिली. या एकत्रीकरणाला प्रमुख नेत्यांनी दुजोरा दिला नसला तरीही एकत्र येऊच नये, अशीही भूमिका कोणी घेतलेली दिसत नाही. या एकत्रिकरणाला पूरक राजकीय परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.

Ajit Pawar-Sharad Pawar
Vasantrao Naik: शेती, मातीवर श्रद्धा असणारे मुख्यमंत्री

दोन पक्ष एक होणार का?

राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली. या निवडणुकीत राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक प्रभावी असलेल्या पवार कुटुंबात मोठाच दुरावा निर्माण झाला. बारामतीत काका - विरुद्ध पुतण्या अशी लढाई झाल्याने हे संबंध अधिकच चिघळले. परिणामी दिवाळीनिमित्त एकत्र येणारे पवार कुटुंब या दिवाळीत मात्र वेगळे झाले. शरद पवार आणि अजित पवार यांनी स्वतंत्रपणे दिवाळी साजरी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हा दुरावा असाच वाढत जावा, अशी पवार विरोधकांची भावना भावना फळाला येत गेली.

आघाडीत स्वबळाची भाषा

विधानसभा निवडणुकीत आघाडीचे पानिपत झाले. त्यामुळे सर्वच पक्षात अस्वस्थता आहे. निवडणुकीतील पराभवासाठी या पक्षात एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. तसेच अनेक मुद्द्यांवर आघाडीअंतर्गत मतभेद सुरू झाले आहेत. समाजवादी पक्षाने तर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्हीएमवरूनही आघाडीतील पक्षांची वेगवेगळी भूमिका आहे. धारावी मुद्द्यावरून काँग्रेस, शिवसेना एका बाजूला असून राष्ट्रवादी काँग्रेसने या मुद्यावर मौन बाळगले आहे. आघाडीतील ही बिघाडी दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळेच आघाडीतील पक्ष आता स्वबळावर लढण्याची भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळेच आघाडीतील पक्षांना आणि नेत्यांना भवितव्याची चिंता लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा झालेला वाढदिवस राष्ट्रवादीच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्याना भविष्याच्या दृष्टीने आशादायक वाटत आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनातील विचारांना आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी वाट करून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत, अशी प्रांजळ भावना त्यांनी व्यक्त केली. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे त्यांनी नमूद केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे, अशी कार्यकर्त्याची इच्छा असून आपलीही भावना तशीच असल्याचे त्यांनी सांगितले. मुळात पवार घरातील कौटुंबिक बंध अतिशय घट्ट आहेत. शरद पवार हे वरकरणी कठोर राजकारणी वाटत असले तरी कुटुंबाच्या पातळीवर किंवा अजित पवार यांच्याबाबत त्यांचे ममत्व अनेकदा दिसले होते.

Ajit Pawar-Sharad Pawar
Jitendra Awhad: फडणवीसांची 'मनोरूग्ण नवी टेक्नीक'; आव्हाडांना नेमकं काय म्हणायचंय!

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार असताना माध्यम प्रतिनिधींना उद्देशून आक्षेपार्ह बोलल्यानंतर माध्यमांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. पण शरद पवार यांनी स्वत: माफी मागत तो वाद मिटवला होता. घरचा कर्ता पुरुष म्हणून शरद पवार यांनी अधिकारवाणीने अजित पवार यांना अनेकदा सल्लाही दिला आहे. मात्र पक्षफुटीनंतर त्यांच्यातील संबंध ताणले गेले होते. कौटुंबिक पातळीवरही फूट पडल्याचे दिसते. ही फूट कुटुंबातील सदस्यच नव्हे तर कार्यकर्त्यांना बोचणी लावणारी आहे. त्यानंतर वाढदिवसानिमित्त झालेल्या भेटीनंतर हा वाढलेला तणाव निवळण्यास मदत झाली आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांनी सारख्याच भावना व्यक्त करताना दोन्ही पवारांकडे बोट दाखवत, त्यांच्या कोर्टात चेंडू ढकलला आहे.

दोन पक्ष एकत्र येऊ शकतात

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पुन्हा कार्यकर्त्यांची मोठी फौज बांधावी लागणार आहे. समीकरणे जुळवावी लागणार आहेत. सत्ता नसताना आणि पुढील काळ फारसा आशादायी नसल्याने अजित पवार यांच्या सोबत जाण्याची अनेकांची तयारी आहे. मात्र, पक्षफुटीनंतर शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे केलेले पानिपत आणि विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागूनही पुन्हा लढण्याची त्यांची उर्मी यामुळे बरेच कार्यकर्ते पवार यांच्यासोबत आहेत. तरीही सत्ता हेच धोरण असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ‘योग्य वेळी योग्य निर्णय’ हे ब्रीदही आहे. हे सर्वांच्या ध्यानी मनी रुजले आहे हेही तितकेच खरे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीच्या तोंडावर जर राष्ट्रवादीत काही घडामोडी घडल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com