Sanjay Raut | Sanjay Shirsat | Bribery Allegations Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : 'शिंदेंच्या मंत्र्याने अण्णा भाऊ साठे ट्रेनिंग सेंटरसाठी 5 कोटींची लाच मागितली'; ठाकरेंच्या नेत्याच्या फेसबुक पोस्टने खळबळ, थेट घटनाक्रमच सांगितला

Sanjay Raut on Sanjay Shirsat : ठाकरेंच्या नेत्याने आपल्या पोस्टमध्ये लातूर येथील नरसिंग उरगिरकर यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. उरगिरकर यांनी त्यांच्या आरती सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव ६ ऑक्टोबर २०२५ रोजी समाजकल्याण मंत्रालयात सादर केला होता.

Jagdish Patil

Mumbai News, 25 Nov : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यासह महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये लातूर येथील नरसिंग उरगिरकर यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. उरगिरकर यांनी त्यांच्या आरती सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव ६ ऑक्टोबर २०२५ रोजी समाजकल्याण मंत्रालयात सादर केला होता. मात्र, हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत यांच्या पोस्टनुसार, या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी संबंधित मंत्र्यांनी २० टक्के कमिशन म्हणजेच सुमारे पाच कोटी रुपयांची मागणी केली. मुंबईतील एका खासगी निवासस्थानी ७२ व्या मजल्यावर बोलावून ही रक्कम मागितल्याचा आरोप नरसिंग उरगिरकर यांनी केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. पैसे न दिल्यामुळेच प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणी नरसिंग उरगिरकर यांनी यापूर्वी सरकार दरबारी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. मात्र, त्यातून कोणताही निष्कर्ष निघाला नसल्याचे राऊत यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

'अण्णाभाऊ साठेंच्या नावाने पाच कोटींची लाच मागितली जाते'

या प्रकरणावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला आहे. अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीतील योगदान मोठे आहे. अशा महापुरुषांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावासाठी पाच कोटींची लाच मागितली जात असेल, तर अशा दलितोद्धाराचा काय उपयोग? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

'आपले सरकार भ्रष्टाचाराची खाण बनले आहे. राज्याची आणि जनतेची लूट खुलेआम सुरू आहे. लहान कामांसाठीदेखील मंत्री पैसे मागत आहेत, हे अराजक आहे,' अशा शब्दांत त्यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. तसेच, नरसिंग उरगिरकर यांची ही कहाणी राज्यातील प्रत्येक नागरिकाची व्यथा असल्याचे म्हणत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, या आरोपांवर मंत्री संजय शिरसाट यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT