Shaktipeeth Highway : 'एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द'; आबिटकरांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांचा उद्रेक, सांगलीतही प्रशासनाची माघार!

Kolhapur And Sangli Farmers Protest Shaktipeeth Highway Mapping Survey : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला राज्यभर विरोध होताना दिसत आहे.
CM Devendra Fadnavis dream project Shaktipeeth Highway
CM Devendra Fadnavis dream project Shaktipeeth HighwaySarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur/ Sangli News : शक्तिपीठ महामार्गावरून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात मॅपिंगसाठी येणारे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात संघर्षाच्या घटना घडत आहेत. आज (मंगळवारी) कोनवडे येथे संतप्त शेतकऱ्यांनी मॅपिंग मशीन पेटवून दिले, तर म्हसवे येथे मॅपिंगसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले. विशेष म्हणजे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याच मतदारसंघात हा संघर्ष पेटल्याने त्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातही शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. माहुली येथे मोठ्या पोलिस बंदोबस्तात मोजणीसाठी आलेल्या वाहनासमोर शेतकरी आडवे पडले. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाला माघार घ्यावी लागली. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गावरून राज्य सरकार आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

पहाटेपासूनच शेतकरी एकवटले; मॅपिंग मशीन पेटवले

आज पहाटे पाचच्या सुमारास म्हसवे, कोनवडे, निळपण आणि नाधवडे येथे शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणी आणि मॅपिंगसाठी अधिकारी येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. त्यानंतर गावोगावचे शेतकरी एकत्र आले. कोणत्याही परिस्थितीत महामार्गासाठी आपल्या जमिनी देणार नाही, असा ठाम पवित्रा घेत शेतकऱ्यांनी मॅपिंगच्या कामाला विरोध केला.

CM Devendra Fadnavis dream project Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : पांडुरंगा, मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ रद्द करण्याची सुबुद्धी द्या : महाविकास आघाडीच्या नेत्यांचे साकडे

यावेळी काही ठिकाणी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला. कोनवडे येथे संतप्त शेतकऱ्यांनी मॅपिंग मशीन पेटवून दिल्याने आंदोलनाला अधिक तीव्र वळण मिळाले. म्हसवे येथेही शेतकऱ्यांच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पिटाळून लावत मॅपिंगला विरोध केला.

'एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द'; गारगोटीत आक्रोश मोर्चा

भुदरगड तालुक्यातील या घटनांचे पडसाद गारगोटीतही उमटले. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांनी भुदरगड प्रांत कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढला. 'एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द', 'जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची', 'या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय', अशा घोषणांनी गारगोटीचा परिसर दणाणून गेला. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गारगोटी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

'विकासाच्या नावाखाली आमच्या जगण्याचा आधार हिरावू नका'

गारगोटीतील आक्रोश मोर्चात महिला शेतकऱ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. आपल्या जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी कुटुंबे रस्त्यावर उतरली होती. शेती हा आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. पिढ्यान् पिढ्या याच जमिनीवर शेती करून आम्ही आमचा संसार उभा केला आहे. विकासाच्या नावाखाली आमच्या जगण्याचा आधार हिरावून घेऊ नका, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

CM Devendra Fadnavis dream project Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : आंदोलन पेटणार! तीव्र विरोधानंतरही 'शक्तीपीठ'साठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जारी

सांगलीत शेतकरी मोजणीच्या वाहनासमोर आडवे; राजू शेट्टी आंदोलनस्थळी

कोल्हापूरप्रमाणेच सांगली जिल्ह्यातही शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन तीव्र झाले आहे. खानापूर तालुक्यातील माहुली येथे आज सकाळी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह प्रशासनाचे अधिकारी मोजणीसाठी दाखल झाले होते. मात्र, मोजणी होणार असल्याची माहिती मिळताच पहाटेपासूनच वाळवा, खानापूर तालुक्यांसह सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने माहुली येथे जमा झाले होते.

सकाळपासूनच पोलिस प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू होता. दीपक लाड, इंद्रजित पाटील यांच्यासह शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांनी मोजणीच्या वाहनासमोर आडवे पडत निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे अखेर मोजणीसाठी आलेले वाहन माघारी फिरले. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही आंदोलनस्थळी उपस्थिती लावली.

पालकमंत्री आबिटकरांसमोरील आव्हान वाढले

शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. मात्र, आता प्रत्यक्ष मोजणी आणि मॅपिंगच्या कामाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघातच मॅपिंग मशीन पेटवण्यापर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढल्याने या प्रश्नावर आबिटकर काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

CM Devendra Fadnavis dream project Shaktipeeth Highway
shaktipeeth highway : फडणवीसांच्या ड्रिम प्रोजेक्टला शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा विरोध? म्हणे, 'नवा मार्ग कोकणावर अन्याय करणारा'

एकीकडे राज्य सरकार शक्तिपीठ महामार्गासाठी आग्रही असताना दुसरीकडे शेतकरी जमिनी न देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांत मोजणीला विरोध होत असल्याने राज्य सरकारसमोरील आव्हान वाढले आहे. आता सरकार शेतकऱ्यांशी संवाद साधणार की पोलिस बंदोबस्तात मोजणीची प्रक्रिया पुढे नेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.