Mumbai News, 09 News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
सरकारने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करून घेतला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा दावा राऊत यांनी केला. “सरकारला मनोज जरांगे पाटील यांना मारायचंय. त्यांची लढाई आणि संघर्ष हा त्यांच्या गळ्याचा फास बनला आहे. सरकारच्या दृष्टीने जरांगे पाटील यांचा उपयोग संपला आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
त्यांच्या उपोषणाचा निवडणुकीसाठीही वापर करून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे मिळावीत, या मागणीवर ते ठाम आहेत. उपोषणामुळे गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती खालावली आहे.
सोमवारी रात्री जरांगे पाटील यांची प्रकृती अधिक बिघडली होती. यावेळी मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी त्यांना सलाईन लावून घेण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी सलाईन घेण्यास होकार दिला. अनेक दिवस अन्न न घेतल्याने त्यांना मोठ्या अशक्तपणाचा सामना करावा लागत असून, शरीरातील साखरेची पातळीही कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, सरकारकडून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आवश्यक निर्णय घेतल्याचे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असतील तर तो त्यांचा निर्णय आहे. मराठा समाजाच्या व्यापक हितासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले होते. सरकारच्या या भूमिकेवरूनच संजय राऊत यांनी निशाणा साधला. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची स्थिती पाहता सरकारची भूमिका अमानुष असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.