Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या रणांगणात चौरंगी लढत? सत्ताधारी राष्ट्रवादीसमोर युगेंद्र पवारांसह भाजप-शिवसेनेचे आव्हान; माघारीच्या समीकरणाकडे लक्ष

Someshwar cooperative sugar factory election : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी कारखाना निवडणुकीत सक्रिय सहभाग जाहीर केल्याने निवडणुकीला वेगळे वळण मिळाले आहे. मुरुम आणि निंबूत येथील मेळाव्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांच्या गटाकडून स्वतंत्र पॅनेल उभे करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे.
Someshwar Sugar Factory
Someshwar Sugar FactorySarkarnama
Published on
Updated on

Pune News, 09 News : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्याने इच्छुकांची धावपळ वाढली असून, कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने चार प्रमुख राजकीय प्रवाह आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), भाजप आणि शिवसेना यांनी स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी सुरू केल्याने सोमेश्वरच्या इतिहासात प्रथमच चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र आणि सुमारे २९ हजार सभासद असलेल्या सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच संपर्काचा धडाका लावला आहे. चेअरमन व संचालक मंडळाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये घोंगडी बैठका घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी होळ येथे सभासद व शेतकरी मेळावा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

नव्या-जुन्यांचा समन्वय साधत सर्वसमावेशक संचालक मंडळ उभे करण्याचे संकेत देतानाच अजित पवार यांनी कारखान्यासाठी केलेली कामे, सभासदांशी असलेले संबंध आणि ऊस उत्पादकांना मिळालेला दर या मुद्द्यांवर राष्ट्रवादीच्या बाजूने सभासदांनी कौल द्यावा, असे आवाहन करण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी गटाने आपली पारंपरिक पकड कायम ठेवण्यासाठी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

युगेंद्र पवार मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी कारखाना निवडणुकीत सक्रिय सहभाग जाहीर केल्याने निवडणुकीला वेगळे वळण मिळाले आहे. मुरुम आणि निंबूत येथील मेळाव्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांच्या गटाकडून स्वतंत्र पॅनेल उभे करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे.

Someshwar Sugar Factory
Prataprao Jadhav Vidyadhar Mahale : शिवसेना आमदाराने थेट मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांसोबत वैर पत्करले : त्याच सचिवांना शिवसेना मंत्र्याकडून ‘जादू की झप्पी’; पडद्यामागे नवी राजकीय समीकरणं?

कारखान्यातील कामगार भरती, वर्षानुवर्षे संचालक मंडळात कायम असलेले चेहरे, साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना मिळणारा दर, ऊस तोडणीतील विलंब आणि गेटकेन उसाचा प्रश्न यांसारखे मुद्दे युगेंद्र पवार यांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. उच्चशिक्षित तरुण, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नव्या नेतृत्वाचा चेहरा पुढे करत निवडणुकीत उतरण्याचे संकेत मिळत असल्याने सत्ताधारी राष्ट्रवादीच्या मतपेढीला याचा कितपत फटका बसतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपची स्वतंत्र चाचपणी

भाजपनेही निंबूत येथे सभासद व कार्यकर्त्यांचा मेळावा घेत सोमेश्वरच्या निवडणुकीत स्वतंत्र ताकदीने उतरण्याचे संकेत दिले आहेत. सहकार महर्षी चंद्रराव तावरे, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, शेखर वडणे, दिलीप खैरे, डॉ. नितीन सावंत, दिग्विजय काकडे, वैभव सोलनकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीला वेग देण्याचे आवाहन केले. भाजप स्वतंत्र पॅनेल उभे करणार की ऐनवेळी स्थानिक समीकरणानुसार भूमिका बदलणार, याकडे आता सभासदांचे लक्ष लागले आहे.

शिवतारेंनीही दिले मैदानात उतरण्याचे संकेत

माजी राज्यमंत्री आणि पुरंदरचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांनीही सोमेश्वरच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकरी हिताचे सर्वसमावेशक पॅनेल उभे करून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवावी आणि सर्व जागांवर उमेदवार देण्याची तयारी ठेवावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपसोबत शिवसेनेची भूमिका काय राहणार, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.

Someshwar Sugar Factory
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहित तरुणाने संपवलं जीवन; लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, महामार्गावर चक्काजाम!

सत्तेत एकत्र, कारखान्यात वेगळे!

राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना हे घटक पक्ष एकत्र असले, तरी सोमेश्वरच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर त्यांचे मार्ग वेगळे होताना दिसत आहेत. त्यामुळे सत्तेतील मित्रपक्ष कारखाना निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहणार का? हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माघारीच्या टप्प्यात कोण कोणाशी हातमिळवणी करणार, कोण माघार घेणार आणि कोणाला कोणाचा पाठिंबा मिळणार, यावर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

तरुण चेहऱ्यांना संधी; जुन्यांची कोंडी?

यंदाच्या निवडणुकीत युवकांचा वाढता सहभाग हेही विशेष ठरत आहे. विविध गटांकडून तरुण चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून संचालक मंडळात असलेल्या जुन्या चेहऱ्यांसमोर नव्या पिढीचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. आता प्रश्न फक्त निवडणूक किती पॅनेलमध्ये होते हा नाही; तर शेवटच्या क्षणी कोण कोणासोबत येते, कोणाचे मतविभाजन होते आणि सोमेश्वरच्या २९ हजार सभासदांचा कौल नेमका कुणाच्या पारड्यात पडतो, याकडेच जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com