Sanjay Raut And Devendra Fadnavis : राज्यपालांसह भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेली बेताल वक्तव्य,सीमाप्रश्न, महाराष्ट्राबाहेर जाणारे प्रकल्प, बेरोजगारी, महागाई अशा विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत महाविराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या मोर्चाला ऩॅनो मोर्चा म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीला डिवचलं होतं. त्यानंतर फडणवीसांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक व्हिडीओ टि्वट केला होता. पण आता पुन्हा एकदा फडणवीसांनी राऊतांवर गंभीर आरोप केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीच्या मोर्चाला मी नॅनो मोर्चा म्हटलं होतं, कारण तो नॅनोच होता. सात संघटना एकत्र करूनही त्यांना २०-२२ हजार लोक जमा करता आले नाही.
त्यानंतर संजय राऊतांनी एक व्हिडीओ टि्वट केला, पण संजय राऊतांनी ट्वीट केलेला व्हिडीओ मराठा मोर्चातील आहे अशी माहिती मला मिळाली आहे. याची मी नक्की पडताळणी करेन. हा व्हिडीओ मराठा मोर्चातील असू शकतो. कारण 'मविआ'चा मोर्चा एवढा मोठा नव्हता. त्यामुळे राऊतांना दुसऱ्या मोर्चाचा व्हिडीओ टि्वट करावा लागला असा हल्लाबोलही फडणवीसांनी केला आहे.
''देवेंद्रजी,असं वागणं बरं नाही!''
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महाविराट मोर्चाला नॅनो मोर्चा म्हणून डिवचलं होतं. यानंतर ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये भगवे झेंडे हातात घेतलेल्या लोकांची गर्दी दिसत आहे. ही गर्दी महामोर्चात आलेल्या लोकांनी केल्याचा दावा राऊतांनी केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवलं, तो हाच मोर्चा आहे. देवेंद्रजी, असं वागणं बरं नाही अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर पलटवार केला होता.
फडणवीस नेमकं काय म्हणाले होते..?
तीन पक्ष एकत्र येऊन एवढा लहानसा मोर्चा निघाला. आज कुणी ड्रोन शॉट दाखवू शकलं नाही. सगळे क्लोजअप दाखवत होते. कारण ड्रोन शॉटलायक मोर्चाच नव्हता. आम्हांला हे आधीही माहिती होतं. आम्ही त्यांना विनंती केली होती की आझाद मैदानावर या. पण मोर्चात आझाद मैदानाइतकी संख्या राहणार नाही हे त्यांना माहिती असल्यामुळे जिथे रस्ता निमुळता होतो, अशी जागा त्यांनी निवडली. त्यामुळे या मोर्चाचं कोणतं विराट स्वरूप उद्धवजींना दिसलं? त्यांचा पक्ष जसा नॅनो होतोय, तसा हा मोर्चाही नॅनोच आहे अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.