bjp ncp shivsena
bjp ncp shivsena Sarkarnama
मुंबई

जेष्ठांनो आता थांबा; कार्यकर्त्यांना संधी द्या!

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : सगळ्याच राजकीय पक्षांत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलले जाते, अशी ओरड दर निवडणुकीत ऐकायला येते. सतरंज्या उचलण्यासाठीच आहोत की काय अशी या कार्यकर्त्यांचीही भावना झालेली आहे आता, मात्र २० ते २५ वर्षे ज्यांचे निष्ठेने काम केले, अशा ज्येष्ठ नगरसेवकांनी (Corporator) थांबून आगामी निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी दबक्या आवाजात पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात जोर धरू लागली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मावळत्या सभागृहात भाजप (Bjp), राष्ट्रवादी कॉंग्रेस (Ncp) , शिवसेना (shivsena) असे सर्वपक्षीय मिळून सुमारे ३० ते ३५ नगरसेवक अनेक टर्म आहेत. काही, तर चार-सहा टर्म झालेले आहेत. महापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारुढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. अशा दिग्गजांच्या साम्राज्यात निष्ठावान कार्यकर्ते, मात्र आपल्याला कधी संधी मिळणार? या प्रतीक्षेत आहेत.

२०१७ मध्ये पिंपरी महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आली. त्यामुळे अनेक नवोदितांना संधी मिळाली. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत किमान २० आणि भाजपातही १५ नगरसेवक असे आहेत की ते गेले काही टर्म कायम आहेत. आमदार- खासदार असल्यास आपल्या कार्यकर्त्यांना नगसेवक, पदाधिकारी बनवण्याची संधी असते. मात्र, नगरसेवकपद भूषवणाऱ्यांना आपल्या समर्थक, निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देता येत नाही. परिणामी, राजकीय महत्त्वाकांक्षेतून जोडलेले कार्यकर्ते स्वत: तयारीला लागतात. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून विद्यमानांना संधी दिली जाते. त्यामुळे अपेक्षा असतानाही गुणवंत नवोदितांना संधी मिळत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नगरसेवकांनी स्वत:हून नगसेवकपदाची खूर्ची खाली करावी, असा विचार शहरात जोर धरू लागला आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विचार केला असता सहा टर्म पूर्ण झालेले सर्वांत ज्येष्ठ योगेश बहल यांचा पहिला क्रमांक लागतो. ३० वर्षे बहल महापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारुढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता म्हणून काम करीत आहेत. त्यानंतर चार टर्म झालेल्या मंगला कदम, अजित गव्हाणे यांचा नंबर लागतो. सलग चारवेळा निवडून आलेले आणि पाचव्यांदा स्वीकृत असलेले भाऊसाहेब भोईर, सलग तीन टर्म झालेल्या सीमा सावळे, उषा वाघेरे, अपर्णा डोके, जयश्री गावडे, डब्बू आसवाणी, संतोष लोंढे, विलास मडिगेरी अशी अनेक नावे आहेत. तीन ते पाच टर्म म्हणजे १५ ते २५ वर्षांत त्याच- त्या प्रभागात नेतृत्व करणाऱ्या माजी नगरसेवकांनी पुन्हा त्याच प्रभागातील नागरिकांसाठी विकासकामांसाठी मते मागण्याची तयारी केल्यास त्यांना मतदारांनी आपल्या दारात का उभा करावे? असा सवाल सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

त्यामुळे ज्येष्ठांनी आता जागा खाली करावी आणि कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असा अंडरकरंट शहराच्या राजकारणात दिसतो आहे. माजी महापौर आर. एस. कुमार यांचा सर्वाधिक काळ नगरसेवक म्हणून काम केल्याचा विक्रम आहे. मात्र, अगदी नवख्या अमित गावडे यांनी त्यांचा गतवेळी २०१७ ला पराभव केला. ही वस्तुस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण, तीन-चार टर्म असलेल्या नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी केवळ झेंडे लावून प्रचार करायचा का? राजकीय सतरंजा उचलायच्या का? असा प्रश्न आगामी पालिका निवडणुकीनिमित्त पुन्हा विचारला जात आहे. दुसरीकडे ज्येष्ठांना आता आपल्या राजकीय वारसदारांना 'लाँच' करायचे आहे? त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा २० ते २५ वर्षे घराणेशाहीचे पाईक व्हावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठांनो आता थांबा आपल्या कार्यकर्त्यांना संधी द्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT