Devendra Bhuyar | Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

आमदारांची काळजी घ्या : शरद पवारांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना तंबी

राज्यसभा निवडणुकीनंतर खुद्द शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतला आढावा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई :‘‘राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत असणारे अपक्ष आणि काही लहान पक्षाच्या आमदारांनी घेतलेली भूमिका चिंताजनक असून सर्वच पक्षांच्या आमदारांच्या व्यथा गांभीर्याने घ्या. आमदारांची कामे रखडणार नाहीत याची काळजी घ्या,’’ असा मोलाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी स्वपक्षीय मंत्र्यांना दिला. (Sharad Pawar asks ministers to take MLAs complaints seriously)

महाविकास आघाडीच्या सरकारला १७१ आमदारांचे पाठबळ असतानाही राज्यसभा निवडणुकीत आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. यामागे अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांची नाराजी प्रकर्षाने समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. भारतीय जनता पक्षाने आमदारांमधील याच नाराजीचा फायदा उठवत आघाडीची दहा मते फोडून त्यांचा तिसरा उमेदवार विजयी केला. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमधे नाराजीचे चित्र आहे. पवार यांनी सरकारला कसलाही धोका नसल्याचे आज स्पष्ट केल्याचे समजते. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची मते राज्यसभा निवडणुकीत एकत्र राहिली याबाबतचे समाधान असले तरी अपक्ष आणि लहान पक्ष यांच्याबाबत सरकारचा सावत्रभाव असू नये. आमदारांचे प्रश्न आणि मागणी याकडे दुर्लक्ष होऊ, नये यासाठीचा कौल राज्यसभा निवडणुकीने दिल्याचे स्पष्ट केले.

मानसन्मान राखायलाच हवा
एका विशिष्ट परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असून तिन्ही पक्षाचे आमदार आणि अपक्ष व लहान पक्ष यांचा मानसन्मान राखायलाच हवा असे पवार यांनी निक्षून सांगितले. आगामी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्यासाठीचे नियोजन आणि समन्वय अत्यंत काटेकोरपणे पाळावाच लागेल. असेही ते म्हणाले.

पवार यांच्या सूचना
- विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने आपापल्या पक्षाच्या उमेदवारासह आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी समन्वय आवश्यक
- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेला न्यायालयीन संघर्ष देखील विधान परिषद निवडणुकीत महत्त्वाची भूमिका
-आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेसचाही दुसरा उमेदवार विजयी होईल अशी रणनीती एकत्रपणे आखावी

ममता बॅनर्जींच्या बैठकीला हजर राहणार
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप विरोधी पक्षांनी सर्वसमावेशक उमेदवार देण्याची रणनीती ठरविण्यासठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीला शरद पवार स्वतः हजर राहणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेने त्यांचा प्रतिनिधी पाठवणार असल्याचे अगोदरच जाहीर केले आहे. काँग्रेसने मात्र या बैठकीच्या आयोजनाबाबत आक्षेप घेतला आहे. असे असले तरी ‘राष्ट्रवादी’ या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे आजच्या बैठकीत निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT