Pune News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या निवडणुकीसाठी इतर पक्षांतील नेत्यांना आपल्या पक्षात आणून राजकीय ताकद वाढवण्यावर महायुतीतील भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचा भर असणार आहे, तसे संकेतही या तीनही पक्षांच्या प्रमुखांकडून दिले जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांकडून (Sharad Pawar) मोठा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सोमवारी (ता.13) मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीबाबत रणनीती आखण्यात आली. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
मुंबईतील या बैठकीला पुणे,सातारा,कोल्हापूर,सांगली,सोलापूर,छत्रपती संभाजीनगर,जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतील खासदार आणि आमदार हजर होते. दरम्यान, शरद पवारांनी या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अशा नवख्या तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP) एकूण जागांपैकी 50 टक्के जागांवर निवडणूक लढवण्याची संधी दिली जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच या निवडणुकीत अधिकाधिक तरुणांना संधी कशाप्रकारे देता येईल,याबाबतच्या सूचनाही पवारांनी याच बैठकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रत्येक तालुका,जिल्ह्यात नवे चेहरे दिसले पाहिजेत. पक्षात हजारो कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यातून राज्य चालवण्याचं नेतृत्व घडू शकतं असंही वक्तव्य काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी केलं होतं.
अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांवरही या बैठकीत शरद पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले, कधीकाळी एक आमदार आपल्यासोबत होता, पण तो आता काय वक्तव्यं करत आहे, हे सगळं माध्यमांवर येत आहे. त्यामुळे आपल्याला जातीय सलोखा बिघडवायचा नाही, तो राखण्याचे आदेशही पवारांनी यावेळी दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.