sharad pawar | ajit pawar sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार यांच्या 'NCP'ची सर्वोच्च न्यायालयात धाव; विधानसभेपूर्वी अजितदादांचं 'टेन्शन' वाढणार?

Assembly Election 2024 : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून विधानसभेची तयारी सुरू आहे. यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं अजितदादा पवार यांच्या पक्षाचा जीव भांड्यात टाकला आहे.

Akshay Sabale

विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अडचणी वाढू शकतात. कारण, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं अजितदादांच्या राष्ट्रवादीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. "दोन्ही गटांना नवीन निवडणूक चिन्हे द्यावीत," अशी याचिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी दाखल केली. त्यामुळे विधानसभेपूर्वी अजितदादांच्या 'टेन्शन'मध्ये भर पडली आहे.

सदर याचिका तातडीनं सुनावणी होण्यासाठी सूचिबद्ध करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ( Ncp ) वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भूयान यांच्या खंडपीठाकडे केली होती. त्यानुसार ही याचिका 25 सप्टेंबरला सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे.

अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांनी आमदारांसह बंडखोरी केल्यानं राष्ट्रवादीत उभी फूट पडली. त्यानंतर निवडणूक आयोगानं अजितदादा यांच्या गटाला आमदारांच्या बहुमताच्या जोरावार राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि घड्याळ चिन्ह दिलं. तसेच, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 'तुतारी फुंकणार माणूस' हे चिन्ह आणि 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' हे नवीन नाव दिलं.

नवीन नाव आणि चिन्ह घेऊन शरद पवार यांची राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीत उतरली आणि घवघवीत यश मिळवत 8 जागा जिंकल्या. मात्र, अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर यश मिळवता आलं.

पण, अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला खरा पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या 6 फेब्रुवारीच्या निर्णयाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना नवीन निवडणूक चिन्हे देण्यात यावीत, अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते? हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नवीन चिन्ह देण्याचे निर्देश दिले, तर अजितदादा पवार यांची डोकेदुखी वाढू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT