mahesh tapase, eknath shinde Latest News
mahesh tapase, eknath shinde Latest News  sarkarnama
मुंबई

शिंदे गटाने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले....पण टीका राष्ट्रवादीने केली...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ईडी सरकारमधील मंत्र्यांनी आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balashaheb Thackeray) यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. हे दर्शन आस्थेपोटी घेतले असते तर त्यांनी शिवसेना (Shivsena) फोडली नसती. शिवसेनेत बंड करायचे आणि आस्था आमची बाळासाहेबांशी आहे हे दाखवायचं यामध्ये आस्था किती आणि लालसा किती हे राज्यातील जनतेला कळून चुकलं आहे,असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला आहे. मात्र शिवसेनेच्या आधी ही टीका राष्ट्रवादीकडून झाल्याने जोरदार चर्चा होत आहे. (mahesh tapase, eknath shinde, NCP Latest News)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळापासून काही अंतरावर आहे. परंतु ज्या लोकांकडून भारतीय राज्यघटनेची पायमल्ली केली गेली आहे त्यांच्याकडून स्मारकाचे दर्शन घेतले जाईल का हा विचार करणंच चुकीचं आहे. ज्यांना घटनाच मान्य नाही ते डॉ. बाबासाहेबांचा काय आदर करणार आहेत, असा खोचक टोलाही तपासेंनी लगावला आहे.

ईडी सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू कोणत्या मंत्र्यांकडे कोणती खाती असणार याची स्पष्टता दिसत नाही. शिंदे गटावर भाजपचा दबाव असल्याने शिंदे गटाला दुय्यम दर्जाची खाती देऊन भाजप आपल्याकडे वजनदार खाती ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटात सध्या चढाओढ सुरू असून एकवाक्यता नसल्याने हे सरकार अधिवेशनाला कसे सामोरे जाणार हा खरा प्रश्न आहे, असेही तपासे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत पक्षात उभी फूट पाडली आहे. यामुळे पक्षाच्या चिन्हाबाबतही प्रश्न निर्माण झाला असून याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आहे. शिंदे आणि इतर बंडखोरांनी बंड करतांना राष्ट्रवादीवर खापर फोडले होते. सेनेच्या आमदारांना निधी दिला जात नव्हता तर त्या मतदारसंघातील त्यांच्या पडलेल्या उमेदवारांना पद्धतशीरपणे ताकद दिली जात असल्याचा आरोप बंडखोरांनी केला होता. तेव्हा राष्ट्रवादीकडूनही यांच्या आरोपास प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान आज शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. मात्र यावर शिवसेनेकडून टीका होण्याआधी राष्ट्रवादीनेच शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. यामुळे चांगलीच चर्चा होत आहे. आता यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT