मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची खिल्ली उडवली होती. याचा एक व्हिडीओही समोर आला होता. आदित्य ठाकरे विधानसभेत प्रवेश करताना नितेश राणेंनी 'म्याव-म्याव' असा आवाज करत त्यांची खिल्ली उडवली. यावरून शिवसेना आणि भाजपचे आमदार समोरासमोर आले. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी सभागृहात नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी केली. त्यांच्या या मिमिक्रीमुळे राणेंच्या विरोधातील इतर मुद्देही सेना सदस्यांना लावून धरले. त्यामुळे ही मिमिक्री राणेंना महागात पडणार असल्याचे चित्र आहे.
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी आदित्य ठाकरे यांचा अपमान केल्याचा मुद्दा उपस्थित केला. ''नितेश राणे वारंवार आदित्य ठाकरे यांचा अपमान करतात, हे आम्ही सहन करणार नाही. नितेश राणे हे आदित्य ठाकरेंच्या विरोधात सातत्याने वक्तव्ये करतात. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांचे नातू हे देखील आमचे दैवत आहेत. आमच्या दैवताचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे राणे यांची चूक माफ करता येणार नाही. असे म्हणत सुहास कांदे यांनी नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी केली.''
सुहास कांदे यांच्या या मागणीला शिवसेनेच्या इतर आमदारांनीही साथ दिली. विशेषतः सुनील प्रभू आणि भास्कर जाधव यांनी आक्रमक भाषणे केली. त्यातही जाधव यांनी नितेश राणेंनी केलेल्या आधीच्या विधानांचा उल्लेख करत भाजपच्या नेत्यांनी त्यांना वेळीच आवरले असते तर ही वेळ आली नसती, असे सांगितले. ``मी तालिका सभापती असताना भाजपचे बारा आमदार निलंबित केले होते. त्यावेळी भाजपने भरविलेल्या अभिरूप विधानसभेत नितेश यांनी माझ्याबद्दल अपशब्द वापरले. मी बिस्किट टाकलेकी कोणावरही भूंकतो, असे नितेश म्हणाले होते. त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यांना समज दिली नाही. असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून त्यांना निलंबित करावे, अशी जोरदार मागणी जाधव यांनी लावून धरली.
शिवसेेनेच्या या आक्रमकपणाविरोधात फडणवीस उभे राहिले. त्यांनी सभागृहाबाहेर नाव न घेता केलेल्या मिमिक्रीबद्दल सदस्याचे निलंबन करण्याचा चुकीचा पायंडा न पाडण्याचे आवाहन केले. भाजपच्या सदस्यांच्या विरोधात कारस्थान असल्याचा दावा त्यांनी केला.
त्यावर राणे यांच्या निलंबनाची मागणी सेनेच्या नेत्यांनी सोडून दिली आणि त्यांनी माफी मागावी, यावर एकमत झाले. अध्यक्षांच्या दालनात यावर चर्चा घेऊन हा विषय मिटविण्याचे ठरले.
- काय आहे प्रकरण
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session 2021) दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. आमदार नितेश राणे हेदेखील इतर भाजप आमदारांसोबत आंदोलन करत होते. भाजप आमदार पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करत असताना आदित्य ठाकरे सभागृहात येत असताना पायऱ्यावर नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज देण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ चांगला व्हायरल झाला होता.
नितेश राणेंचे स्पष्टीकरण
त्यानंतर एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर स्पष्टीकरणही दिलं. "शिवसेनेची अवस्थाच आता मांजरासारखी झाली आहे. म्हणून मी म्याव म्याव केलं. आता शिवसेनेची ही अवस्था कशामुळे झाली हे त्यांनी आधी शोधलं पाहिजे. आधी वाघासारखी डरकाळी देणारी शिवसेना आणि आता म्याव म्याव करणारी शिवसेना झाली असल्याचं त्यांनी म्हटलं. तर, यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो, असं सांगितलं, तर त्यावर आम्हाला आता शिवसेनेच्या आक्षेपाची सवय झाली असल्याचं त्यांनी म्हटलं.
भास्कर जाधवांची मिमिक्री
दरम्यान, शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. त्यावेळी नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका करत त्यांना जोकरही म्हटले होते. एवढेच नाही तर जाधव यांच्यावर बिनशर्त माफी मागावी यासाठी दबावही टाकण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.