Anand Dighe News
Anand Dighe News  Sarkarnama
मुंबई

Shiv Sena : ठाकरे गटाला धर्मवीर आनंद दिघेंचा विसर; बॅनरवर फोटो नसल्याने चर्चा

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : महाविकास आघाडीच्यावतीने (Mahavikas Aghadi) मुंबईत (Mumbai) शनिवारी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, बेरोजगारी, महापुरुषांचा अवमान यासह आदी मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य सरकारला महाविकास आघाडीच्यावतीने घेरण्यात येणार आहे. तर या महामोर्चात ठिकठिकाणाहून शिवसैनिक सहभागी होणार आहेत.

याच महामोर्चाची वातावरण निर्मिती करण्यासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याणमधील शिवसैनिकांना स्वर्गीय आनंद दिघे यांचा आता विसर पडलेला दिसून येत आहे.

कल्याणमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर ठाकरे परिवारातील सदस्य आहेत. मात्र दिघे यांचा फोटो नसल्याने याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. शनिवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा सरकार विरोधात महामोर्चा असून याची जोरदार तयारी महाविकास आघाडीच्या पक्षाकडून सुरू आहे. याची वातावरण निर्मिती करण्यासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना (Shiv Sena) शहर शाखेच्यावतीने मोठ-मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.

कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या शहर शाखेच्यावतीने लावण्यात आलेल्या बॅनरवर स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा फोटो लावण्यात आला आहे. मात्र स्वर्गीय आनंद दिघे यांचा फोटो न लावल्याने आता याची चर्चा रंगू लागली आहे. डोंबिवली शहर शाखेच्यावतीने लावण्यात आलेल्या बॅनरवर दिघे यांचा फोटो आहे.

ठाणे (Thane ) जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्यात स्वर्गीय आनंद दिघे यांचा खूप मोठा वाटा आहे. त्याच प्रमाणे ठाणे, पालघर, रायगड जिल्हा यामध्ये दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे जोरदार प्रचार केला जात होता. त्यावरून अनेक वादाचे प्रसंग घडले.

शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना कल्याणमधील कट्टर शिवसैनिकांनी पाठिंबा देत शिंदे गटाला विरोध केल्याचे आपण यापूर्वी पाहिले होते. मात्र याच शिवसैनिकांनी कल्याणमध्ये झळकवलेल्या बॅनरवर दिघे यांचा फोटो नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला विसर पडला की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.

ठाकरे गटाला धर्मवीर दिघे यांचा विसर पडल्याने शिंदे गटाकडून त्यांचा कडक शब्दात समाचार घेतला जात आहे. तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाल्यानंतर विविध विकासकामे असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम प्रत्येक बॅनरवर धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो असतो. ''ठाकरे गट दिघे साहेबांना विसरला आहे. काम साधून घ्यायचे आणि नंतर वाऱ्यावर सोडायचे'' अशी ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना असल्याची बोचरी टीका शिंदे गटाने केली आहे.

''ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी शिवसेना घडवली. तळागाळात, खेड्यापाड्यात, गावांत जाऊन शिवसेना घडवली आहे. आणि त्याच दिघे साहेबांचा या उद्धव साहेबांच्या शिवसेनेला विसर पडला आहे. कल्याणमध्ये फलक लागले आहेत त्यावर दिघे साहेबांचा फोटो नाही.

यांच काम झाले की बस आणि नंतर वाऱ्यावर कस सोडायच अशी ही उद्धव साहेबांची शिवसेना आहे. मी डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख म्हणून मी कल्याणमधील उद्धव साहेबांच्या सेनेचे व कल्याणमधील पदाधिकाऱ्यांचा निषेध करतो'', असं बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT