मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. महाविकास आघाडी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचे पहिले संकेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनीही सूटक ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे. (Sanjay Raut Latest News)
महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पर्यावरण मंत्री असा उल्लेख हटवला आहे. त्यावर त्यांनी फक्त युवा सेना अध्यक्ष आणि मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष एवढाच उल्लेख ठेवला आहे.
आदित्य यांच्या या ट्विटनंतर संजय राऊतांनीही सूचक ट्विट केलं आहे. 'महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने,' असं राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, शिंदे यांच्यासोबत चाळीसहून अधिक आमदार असल्याने पक्ष फुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मन वळवण्यासाठी मिलिंद नार्वेकरांना सुरतमध्ये चर्चेसाठी पाठवले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शिंदे यांनी पुढं काय करायचं हे पक्क ठरवलं असून तसा निरोप ठाकरेंपर्यंत पोहचवला असल्याचे स्पष्ट झालं आहे. शिंदे यांनीच माध्यमांशी बोलताना याबाबत सूचक संकेत दिले आहेत. (Eknath Shinde Latest News)
एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल जाले आहेत. आपल्यासोबत अपक्षांसह शिवसेनेचे 46 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिुंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाण्याचे ठरवले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मागील अडीच वर्षांपासून आमदारांच्या मनात खदखद सुरू होती. आता निर्णय घेण्याची वेळ आल्याचे आमदारांना वाटले, त्यामुळे हा निर्णय़ घेतल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde in Guwahati with 40 Shiv Sena MLA)
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आम्ही आज सगळे आमदार एकत्र आहोत. आजही शिवसेना सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका, विचारधारा पुढे घेऊन जात आहोत, एवढंच सांगू इच्छितो. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणार नाही. त्यांचे हिंदूत्व, राष्ट्रीयत्व, सामान्य शिवसैनिकांच्या मनातील भावना घेऊन पुढे जात आहोत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
माझी कुणावरही टीका करण्याची सवय नाही. आज बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार एकत्र आले आहे. विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजही कट्टर शिवसैनिक आहे आणि यापुढेही राहील. कारण बाळासाहेब आणि दिघेसाहेब हे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांचे विचार या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला हिंतुत्वाचे विचार दिले. ते विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असं शिंदे यांनी सांगितलं.
गटनेत्याची निवड बेकायदेशीर
कुठल्याही प्रस्तावावर चर्चा झाली नाही, असं सांगत शिंदे म्हणाले, मी मिलिंद नार्वेकर यांना सांगितले की, तुम्ही चर्चा करायला येत असताना मी कुठलाही पक्षविरोधी काम केले नाही, तरीही मला गटनेतेपदावरून काढले. माझे पुतळे जाळत आहात, बदनाम करत आहोत. मी उध्दवजींशीही याबाबत बोललो आहे. आता यापुढची भूमिका आमदारांशी बोलून ठरवली जाईल, असं मी त्यांना सांगितलं आहे. काल निवडलेला गटनेता बेकायदेशीरपणे निवडला आहे. आमदारांच्या बहुमतातून गटनेता निवडला जातो. हे बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे ही निवड अवैध आहे, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.