Shiv Sena Bhavan, Anil Desai, Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

भाजपच्या साडेतीन नेत्यांसाठी शिवसेना भवनात आमदार-खासदार झाडून येणार!

शिवसेना नेते मंगळवारी पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचे संकेत संजय राऊत व अनिल देसाई यांनी दिले आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी सकाळी मोठा गौप्यस्फोट केला. काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोकं तुरूंगात जाणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. आम्ही खूप सहन केलं. आता आम्हीच तुम्हाला बरबाद करू, असा इशारा देत राऊतांनी मंगळवारी शिवसेना (Shiv Sena) भवनात याबाबत पर्दापाश करणार असल्याचे सांगितले आहे. या परिषदेला शिवसेनेचे राज्यभरातील आमदार, खासदार, पदाधिकारी झाडून येणार असल्याने प्रचंड उत्सुकता वाढली आहे.

राऊतांपाठोपाठ शिवसेनेचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनीही तसे संकेत दिल्याने शिवसेनेच्या मनात नेमकं चाललंय, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी ही पत्रकार परिषद ऐकावी, असंही राऊत म्हणाले आहेत. त्यामुळं मंगळवारी शिवसेना भवनातून (Shiv Sena Bhavan) नव्या संघर्षाची सुरूवात होणार असं संकेत राऊत व देसाईंनी आपल्या सूचक वक्तव्यांमधून दिले आहेत. भाजपचे (BJP) साडेतीन नेते कोण, याबाबतही पत्रकार परिषदेत खुलासा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रचं (Maharashtra) लक्ष या परिषदेकडं लागलं आहे.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेही उपस्थित राहणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे इतर बडे नेते, आमदार, खासदार किल्ला लढवणार आहेत. याबाबत बोलताना देसाई म्हणाले, पत्रकार परिषदेला शिवसेना नेते, खासदार सगळे जमणार आहेत. आम्हाला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. पण शिवसैनिक स्वतः उद्या जमतील. आम्ही कोणाला बोलवत नाही.

राज्यात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत, काय-काय केलं जातंय, नेत्यांवर दबाव टाकला जातोय. त्याबाबत उद्या सर्वजण बोलतील. उद्या कोण कोणाच्या रडारवर आहे ते कळेल. जनतेसमोर, सरकारसमोर प्रत्येक नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. लोकांना उद्या कळेल काय चाललंय, असं देसाई यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते राऊत?

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, या पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले जातील. संपूर्ण देश ऐकेल. आम्ही खूप सहन केलं. आता आम्हीच तुम्हाला बरबाद करू. त्यांची दादागिरी सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा, केंद्र सरकारकडून शिवसेना, ठाकरे परिवारावर खोट्या आरोपांचा चिखल उडवला जात आहे. त्याला उद्या उत्तर मिळेल, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला.

अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) कोठडीत महाविकास आघाडीतील नेते जातील, अशा धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत. पण पुढील काही दिवसांत भाजपचे साडे तीन लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर येतील. महाराष्ट्रातही सरकार आहे, हे लक्षात घ्या. हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आहे, हेही लक्षात घ्या. सरकार हे सरकार असतं. कोणात किती दम आहे ते पाहू. त्यांचा बंदोबस्त सुरू आहे, असा इशारा राऊतांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT