Prabhakar Sail
Prabhakar Sail Sarkarnama
मुंबई

प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; भाजपचा 'तो' तरूण पुढारी कोण?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ‘कॉर्डिलिया’ क्रूझवर ड्रग्ज (Cardillia Drugs Party) प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याचा नुकताच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या मृत्यूची चौकशी राज्य शासनाकडून केली जात आहे. साईलचा मृत्यू संशयास्पद असल्याचे काही नेत्यांनी म्हटलं आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणात ट्विस्ट आणला आहे. त्यांनी थेट भाजपच्या (BJP) एका तरूण नेत्याकडं बोट दाखवलं आहे.

राऊत यांनी 'सामना'तील 'रोखठोक' या सदरामध्ये साईलच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यात म्हटले आहे की,‘कॉर्डिलिया’ क्रूझवर ड्रग्ज प्रकरणात जे झाले त्यात शाहरुख खानच्या मुलास सरळ अडकवण्यात आले. ज्या प्रभाकर साईल या पंचामुळे एनसीबी अधिकाऱ्याचा खोटेपणा समोर आला तो प्रभाकर साईल आता संशयास्पदरीत्या मरण पावला. या प्रकरणातील संबंधित अधिकारी भाजपच्या एका तरुण पुढाऱ्याचा सर्व प्रकारचा अनैतिक पाहुणचार घेतात व त्यातूनच प्रभाकर साईलचे बरेवाईट झाले काय, हा तपासाचा विषय आहे. प्रभाकर साईलच्या मृत्यूचा विषय राज्य सरकारच्या तपास यंत्रणांनी अर्धवट सोडता कामा नये. ते रहस्यमय, तितकेच धक्कादायक ठरू शकेल.'

भाजपचा एक प्रमख नेता आणि एक-दोन बड्या अधिकाऱ्यांचा खेळ

माझ्यावर व्यक्तिशः ईडीने कारवाई केली, त्यास कोणताही आधार नाही. पण Selected targets या पद्धतीने महाराष्ट्रात, बंगालात कारवाया सुरू आहेत. अशा कारवायांत नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा थेट हस्तक्षेप असेल असे दिसत नाही. पण महाराष्ट्रातील भाजपचे एक प्रमुख नेते व केंद्रीय तपास यंत्रणांचे एक-दोन बडे अधिकारी मिळून महाराष्ट्रातला खेळ खेळत आहेत. राजकीय विरोधकांवर कशी व कधी कारवाई करायची, त्याआधी बदनामीची मोहीम राबवायची. भाजपशी संबंधित एक-दोन लोकांनी अशा कारवाईसंदर्भात सोशल मीडियावर सूतोवाच करून धमकवायचे हा प्रकार मोदी यांची प्रतिष्ठा पंतप्रधान म्हणून धुळीस मिळवणारा आहे, असं राऊत यांनी नमूद केलं आहे.

केंदीय तपास यंत्रणांचा हंटर

आम्हाला सक्षम आणि मजबूत विरोधी पक्ष हवा आहे, पण आमच्या हातात काय आहे? हे जनतेने ठरवायला हवे, असे विधान देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवार, दि. 6 एप्रिल रोजी राज्यसभेत केले. शहा यांचे बोलणे तर्कसंगत आहे; पण केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून आजचे सत्ताधारी आधीच दुर्बल असलेल्या विरोधी पक्षाचे हात-पाय छाटणार असतील तर काय करायचे, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. विरोधी पक्षाला लगाम राहावा यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा हंटर केंद्राने आपल्या हाती कसा ठेवला आहे त्याची प्रकरणे रोजच समोर येत आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणांचे एक बडे अधिकारी भेटले. त्यांना विचारले, ‘‘नक्की काय सुरू आहे?’’ त्यावर ते एका शब्दांत म्हणाले, ‘‘आम्ही ‘टार्गेट’वर काम करतोय.’’ याचा अर्थ सरळ आहे. यंत्रणांचे राजकीय ‘बॉस’ जे टार्गेट देतील त्यानुसार कारवाया होत आहेत. मी त्यांना विचारले, ‘‘उद्या सरकार बदलले तर कसे कराल?’’ यावर ते म्हणाले, ‘नवे सरकार सांगेल तसे काम करू. त्यांना हवे ते करू.’ याचा अर्थ स्पष्ट आहे. तो समजून घ्यायचा आहे. मुंबई-महाराष्ट्रात पैसा आहे. त्यामुळे येथे प्रत्येक केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याला काम करायचे आहे. अशा अधिकाऱ्यांसाठी जो दिल्लीत रदबदली करेल तो अधिकारी त्या नेत्याचे हुकूम ऐकेल. सध्या तेच सुरू आहे.

तपास यंत्रणांनी स्वतःच पुढे यावे

भाजपचे महात्मा किरीट सोमय्या हे इतरांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे रोज आपटतात. ईडी व सीबीआयची धमकी देतात. पण ‘विक्रांत’ युद्धनौका वाचविण्यासाठी त्यांनी लोकांकडून प्रचंड पैसा गोळा केला. त्या पैशांचा अपहार करून लोकांना आणि देशाला फसविले. त्या फसवणुकीसंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या फसवणुकीची व्याप्ती मोठी आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना स्वतःच पुढे येऊन या प्रकरणाचा तपास करावा असे का वाटत नाही? राकेश वाधवानशी किरीट सोमय्या व त्यांच्या पुत्राचे सरळ जमिनीचे व्यवहार झाले आहेत. त्याबाबत ईडीसारख्या यंत्रणा कारवाईचा कागद हलवायला तयार नाहीत. ओमर अब्दुल्लांपासून मेधा पाटकरांपर्यंत, राणा अयुबपासून आकार पटेलपर्यंत… सध्याच्या व्यवस्थेविरुद्ध बोलणारे मात्र अपराधी ठरले आहेत. दुर्बल विरोधी पक्षावर केंद्रीय तपास यंत्रणांचा हातोडा रोज बसत आहे आणि आपले गृहमंत्री शहा म्हणतात, ‘‘त्यांना विरोधी पक्ष सक्षम झालेला पाहायचा आहे!’’ हा विनोद मनोरंजक आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT