Uddhav-Thackeray-Eknath-Shinde Sarkarnama
मुंबई

Ambernath Politics : अंबरनाथची राजकीय समीकरणे बदलणार; 'मशाल'मुळे शिंदेंच्या शिवसेनेची अडचण; ठाकरे 'म्हात्रे पॅटर्न' राबवणार?

Ambernath Mayor Election Shiv Sena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबरनाथमध्ये मोठा डाव टाकत नगराध्यक्षपदाचा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

शर्मिला वाळुंज

Ambernath News : अंबरनाथ नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चुरस वाढत असतानाच महाविकास आघाडीकडून मात्र अद्याप स्पष्ट रणनीती समोर आलेली नाही. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ‘बदलापूर म्हात्रे पॅटर्न’ अंबरनाथमध्ये राबविण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय वर्तुळात संकेत आहेत. यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे समीकरण बिघडण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.

आघाडीतील काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या पत्नी नूतन पाटील यांचे नाव आघाडीच्या उमेदवारीसाठी जोरदार चर्चेत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आग्रहामुळे त्यांच्या उमेदवारीचा ‘मशाल’ चिन्हावर गंभीरपणे विचार सुरू असल्याचे समजते. महाविकास आघाडी – मनसे एकत्र येण्याची चर्चा असली तरी अधिकृत घोषणा न झाल्याने उमेदवारीचा तिढा कायम आहे. दोन्ही राष्ट्रवादी तसेच इतर घटक पक्षांकडे ठोस चेहरा नसल्याने काँग्रेसचाच पर्याय अधिक सक्षम मानला जात आहे.

भाजपकडून तेजश्री करंजुले यांचे नाव आघाडीवर आहे. तर शिदेंच्या शिवसेनेकडून माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर या अग्रस्थानी आहेत. दोन्ही पक्षांत उमेदवारांचा स्वतंत्र प्रचार सुरू असून, वरिष्ठ नेतेही आपल्या उमेदवाराच्या बाजूने सक्रीय झाले आहेत. त्यामुळे अंबरनाथमध्ये महायुतीची शक्यता कमी आहे.

2015 आणि 2017 मध्ये काँग्रेसचे प्रदीप पाटील यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यंदा ठाकरेंसोबत जाण्याचे संकेत मिळत आहेत, ‘मशाल’च्या जोरावर अंबरनाथमध्ये शिंदे गटाला सरळ टक्कर देण्याच्या तयारीत ते असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

बदलापूरच्या निवडणुकीत भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना दिलेले तिकीट आणि त्यांचे यश हा ‘म्हात्रे पॅटर्न’ अंबरनाथमध्ये रिपीट करण्याची इच्छा ठाकरेंचे कार्यकर्ते व्यक्त करीत असल्याचे बोलले जाते. काँग्रेसच्या नूतन पाटील यांना मशालवर लढण्यासाठी आग्रह वाढत आहे.

लोकसभा निवडणुकीत वैशाली दरेकर आणि विधानसभा निवडणुकीत राजेश वानखेडे यांनी मर्यादित आर्थिक सामर्थ्य असूनही शिंदे गटाला त्रासदायक मतसंख्या मिळवली होती. याउलट प्रदीप पाटील हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने ‘मशाल’ ताकदीने उभा राहू शकतो, हे ठाकरेंच्या शिवसेनेचे गणित दिसते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT