Shivsena
Shivsena  Sarkarnama
मुंबई

खासदाराच्या निकटवर्तीयाच्या आमदारकीच्या स्वप्नाने शिवसेनेत ठिणगी; २५ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली : प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी २७ गावांचा ग्रामीण भाग डोंबिवली (Dombivli) शहरी भागात विलीन करण्याचा निर्णय शिवसेना (shivsena) पक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार २७ गावांतील कामकाज डोंबिवली शहर शाखेच्या माध्यमातून चालणार आहे. गावांचा कारभार शहर शाखेच्या हाती गेल्याने गावातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून २७ गावांतील २५ पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठविला आहे. या राजीनामा नाट्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. (Shiv Sena's 25 upset office bearers resign in Dombivli)

डोंबिवलीतील एका कार्यकर्त्याला आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या सांगण्यानुसार वरिष्ठांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भाग डोंबिवली शिवसेना शहराध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असेल, तर ग्रामीण भागातील पदांना अर्थ काय, असा सवाल या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कल्याण डोंबिवलीतील चार विधानसभा मतदारसंघापैकी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु अंतर्गत गटबाजीमुळे मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बालेकिल्ला गमवावा लागला. विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील भोईर यांचे तिकीट कापून रमेश म्हात्रे यांना देण्यात आले. त्या वेळेस शिवसेनेत दोन गट पडल्याचे उघड झाले होते.

शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मोरे यांना आगामी विधानसभा निवडणूक लढवायची असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. डोंबिवली किंवा ग्रामीण भागातून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून मोरे यांना पुढे करण्याचा प्रयत्न सेनेच्या वरिष्ठ गटातून सुरू आहे. ग्रामीण भागातील २५ पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये कल्याण तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, युवा सेना उपविधानसभा अधिकारी, युवा समन्वयक, सहसंघटक विधानसभा क्षेत्र, शाखाप्रमुख या सर्वांचा समावेश आहे.

केवळ प्रशासकीय कामकाजासाठी बदल : जिल्हाप्रमुख

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात २७ गावे असून प्रशासकीय कामाचा भाग म्हणून सर्व प्रभागांचे काम डोंबिवली शहर शाखेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी ग्रामपंचायती असल्याने ग्रामपंचायत कायदा, कामकाजानुसार पक्षाचे कामकाज चालायचे. प्रशासकीय निवडणूक कामकाजासाठी केवळ हे बदल करण्यात आले आहेत. माझ्याकडे एकाही पदाधिकाऱ्याचा राजीनामा आलेला नाही. त्यांची नाराजी असल्यास ती दूर करण्यास आम्ही सक्षम आहोत, असे शिवसेनेचे कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT