कोल्हापूर : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर आम्ही काही घोषणा केल्या होत्या. त्यात शेतकऱ्यांची (farmer) कर्जमाफी हा महत्वाचा विषय होता. मात्र, दुर्दैवाने कोरोनामुळे त्याची अंमलबजावणी करता आली नाही, याची आम्हाला खंत होती. पण, यंदाच्या अर्थसंकल्पात वीस लाख शेतकऱ्यांना दहा हजार कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. नजिकच्या काळात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. तसेच, दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी वरचे कर्ज फेडले, तर दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा शब्द या संकल्प यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने देतो, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. (Ajit Pawar's big statement for farmers with more than two lakh loans)
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या समारोपाच्या सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते म्हणाले की, आम्ही सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले होते. दुसरे नियमितपणे कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान आणि दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी वरचे कर्ज भरले तर त्यांनाही दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी अशी तिसरी घोषणा केली होती. मात्र, कोरोनामुळे त्याची अंमलबजावणी करता आली नव्हती. पण, यंदाच्या अर्थसंकल्पात वीस लाख शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. कोल्हापुरात शरद पवारांच्या साक्षीने सांगतो की, ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होतील. हे काम पूर्ण झाल्यानंतर दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांनी वरचे कर्ज फेडले तर त्यांनाही दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच, भूविकास बॅंकेची ३५ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत आजची सभा होत आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम आपण व्यवस्थितरीत्या करत आहोत. पण अलीकडे राज्यातले वातावरण गढूळ करण्याचे काम काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. चांगले वकील सर्वोच्च न्यायालयात देत आहोत. तरीही ते न्यायालय सर्वोच्च आहे. जर का उद्या वेगळा निर्णय आला, तर निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीसाठी आतापासूनच कामाला लागा, गाफिल राहू नका, असे आवाहन अजित पवार यांनी यांनी केले.
विरोधकांनी टाकलेले जाळे आणि त्यांनी चालविलेल्या अपप्रचारात न अडकता आपण केवळ विकासाचा अजेंडा कायम ठेवला पाहीजे, याची खूणगाठ कार्यकर्त्यांनी बांधून घ्यावी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सध्या जे नॉन इश्यूवर राजकारण सुरु आहे, त्याबाबत जागृती केली पाहिजे. महागाई आणि इतर गंभीर प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वळविले पाहिजे. राज्य सरकार हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन झाले आहे, याचा प्रचार केला पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.