Vidhan Parishad Latest News
Vidhan Parishad Latest News Sarkarnama
मुंबई

विधान परिषद विरोधी नेतेपद : कॅाग्रेस व राष्ट्रवादीवर मात करण्यासाठी सेनेची फिल्डींग

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधान परिषदेत शिवसेनेचे (Shivsena) १३ आमदार असून विरोधी पक्षात सर्वाधिक आमदारांची संख्या ही शिवसेनेचीच आहे. त्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता विधान (Leader of the Opposition) परिषदेत नेमण्यात यावा, याविषयीचा ठराव आज विधान परिषद (Legislative Council) आमदारांकडून उपसभापती नीलम गोर्‍हे (Neelam Gorahe) यांना सुपूर्द करण्यात आला.

विधान परिषदेतील शिवसेना आमदारांची बैठक ९ जुलै रोजी 'मातोश्री' निवासस्थानी पार पडली. या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता, गटनेता, प्रतोद नियुक्तीचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आल्याचा ठराव करण्यात आला, अशी माहिती आमदार सुनील शिंदे यांनी दिली.

विधान परिषदेत विरोधी पक्षातील शिवसेना आमदारांची संख्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा करणारे पत्र आज विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे यांना देण्यात आले. यावेळी आमदार अंबादास दानवे, सचिन अहिर, मनीषा कायंदे, विलास पोतनीस, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचा ठरावही उपसभापती गोर्‍हे यांच्याकडे सोपविण्यात आला. विधान परिषदेचे सभापतीपदही रिकामी असून या पदासाठी तसेच विरोधी पक्षनेतेपदाचीही निवड आगामी पावसाळी अधिवेशनात होणार आहे. दरम्यान, या पदासाठी शिवसेना आमदार सचिन अहिर आणि अंबादास दानवे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून यांच्यापैकी कोण बाजी मारणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT