Maharashtra Politics |  
मुंबई

सत्तासंघर्ष; समर्थन- विरोधासाठी शिवसैनिक रस्त्यावर

Maharashtra Politics | मुंबईसह, नाशिक, पुणे, औरंगाबाद याठिकाणी बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील राजकीय पेच प्रसंग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या विचारात असून गुवाहाटीत बंडखोर आमदार ठाण मांडून बसले आहेत. शिवसेनेने बंडखोर आमदारांच्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलल्यानंतर आता राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिक (Shivsena) आक्रमक झाले आहेत. मुंबईसह, नाशिक, पुणे, औरंगाबाद याठिकाणी आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संतापलेल्या शिवसैनिकांनी आमदारांच्या कार्यालयांवर हल्ला करत तोडफोड केली आहे. (Maharashtra Politics latest news)

माहीम विधानसभेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात माहीम परिसरात शिवसैनिकानी बाईक रॅली काढली. आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.या रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभागी होत सरवणकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 'निम का पत्ता कडवा है सदा सरवणकर भडवा है', 'गली गली मे शोर शोर सरवणकर चोर है,' अशी घोषणाबाजी करण्यात आली.

माहीम विधानसभा मतदारसंघातून रॅली जात असताना शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी सदा सरवणकर यांचे पोस्टर फाडले तर काही ठिकाणी सदा सरवणकर यांच्या वाचनालयावर आणि शिवसेना शाखेवर असणाऱ्या फोटोंना काळे फासून त्यावर गद्दार लिहण्यात आलं.

तर दूसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मुंबईतील अंबरनाथ या परिसरात शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ अंबरनाथ शहरातही बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र पोलिसांनी हे बॅनर काढून जमा केले. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीविरोधात बंड पुकारल्यानंतर सुरुवातीच्या काळात कुणीही उघडपणे त्यांचं समर्थन केलं नव्हतं. मात्र अंबरनाथ शहरात माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले होते.अंबरनाथ शहरात शिवसेनेत सध्या एकनाथ शिंदेंच्या बाजूने जावं? की उद्धव ठाकरेंच्या याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्या समर्थक गटाने उघडपणे शिंदे गटाची बाजू घेतली असून शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या गटाने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळं शहरात अद्याप तरी तणावपूर्ण शांतता आहे.

तर धुळ्यातही बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. इतकेच नव्हे तर धुळ्यातील शिवसैनिकांनी आमदरांना परत फिरण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर आले. साक्री, दोंडाईचात भक्तीयात्रा काढण्यात आली. तर शिरपूरमध्ये शिवसेना आमदारांच्या बंडखोरीचा निषेध व्यक्त करत रस्त्यावर टरबूज फोडण्यात आले. दरम्यान, साक्रीतील भक्तीयात्रेत शिवसैनिकांनी आमदार मंजुळा गावित यांच्यासह बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे.

शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिरपूर येथे टरबूज फोडून निषेध केला. मुख्यमंत्री ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा जयघोष करून त्यांना समर्थन देण्यात आले. साक्रीत शिवसैनिकांनी भक्तीयात्रेत मुख्यमंत्री ठाकरे यांचे समर्थन केले. साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, त्यांचे पती जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित हे देखील गुवाहाटीत पोचलेले आहेत. त्यांना, तसेच बंडखोरी केलेल्या आमदारांना देखील परतण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. दोंडाईच्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT