Balasaheb Thackeray On Congress Sarkarnama
मुंबई

Balasaheb Thackeray On Congress: हिजडे, नालायक, शेळपट अशा शब्दांनी घायाळ करणारे बाळासाहेब

प्रसाद जोशी - Guest Sarkarnama

Dasara Melava : बाळासाहेबांचा दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी जेवढा प्रेरणादायी होता तेवढाच तो विरोधकांसाठी धडकी भरवणारा होता. बाळासाहेब आपल्या भाषणातून काय भूमिका मांडतात, याकडे सर्वाचे लक्ष असायचे. मराठी माणूस, हिंदूवर होणाऱ्या अन्यायाबद्दल पेटून उठणारे बाळासाहेब काँग्रेसच्या नेत्यांच्या आणि त्यांच्या धोरणांचा कडाडून विरोध करत. असे करताना अनेकदा सार्वजनिक जीवनात असभ्य वाटणाऱ्या किंवा असंसदीय शब्दांचाही बाळासाहेब मुक्तपणे वापर करत असत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वर्ष १९९४ च्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या दसऱ्या मेळाव्यात बाळसाहेबांनी दिल्लीमध्ये हिजडे बसले आहेत, असे घणाघाती शब्द वापरले होते. जेकेएलएफचा म्होरक्या यासीन मालिक याने काश्मीरमधील मस्जिद समोर असणाऱ्या सैन्याच्या खंदकामधील सैन्य माघारी बोलावण्यासाठी दिल्लीत आमरण उपोषण केले होते. या दबावाला बळी पडून तत्कालीन केंद्र सरकारने त्याची मागणी मान्य केल्याने बाळासाहेबांनी अतिशय तीव्र संताप व्यक्त केला होता.

कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला गाडायचेच

महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जाहीर कार्यक्रमात क्रिमिनल संबोधणाऱ्या यासीन मालिकला सोडणारे 'हिजडे' आहेत, असे बाळासाहेब आपल्या भाषणात म्हणाले होते. तसेच काश्मीर आणि चीन सीमारेषेच्या प्रश्नाला पंडित नेहरू हेच जबाबदार असून, त्यांच्या नालायकपणामुळे हे प्रश्न चिघळत राहिल्याचा घणाघाती आरोपही केला होता. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला गाडायचेच, असा ठाम निर्धारही व्यक्त केला होता.

काँग्रेसमध्ये अनके हिजडे आहेत...

वर्ष २०१० मध्ये झालेल्या दसऱ्या मेळाव्यात सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर टीका करताना बाळासाहेबांनी अतिशय संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. “मुर्दाडानो, तुमच्यावर दोन हजार वर्षे मोगलांनी राज्य केले, दीडशे वर्षे ब्रिटिशांनी केले आणि आता इटलीची सोनिया गांधी राज्य करतेय. काँग्रेसमध्ये अनेक हिजडे आहेत आणि सगळे सोनिया गांधीसमोर झुकतात. ही हिजड्यांची औलाद जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत देशाचे भले होणार नाही.” असेही सांगितले होते.

एका हॉटेलमध्ये राजीव गांधींचे प्रेम जुळले...

काँग्रेसमधील घराणेशाहीबद्दल बोलताना बाळसाहेब म्हणतात की, "आमची पिढी त्यांच्यापेक्षा बरी आहे. आमच्या पिढीकडे विचार आहे. त्यांच्याकडे काय आहे? एका हॉटेलमध्ये राजीव गांधींचे प्रेम जुळले. ते आमच्या मुळावर का ? तुम्ही कोणाचे नेतृत्व स्वीकारत आहात, राहुल गांधी नेतृत्व करायच्या लायकीचे आहेत का ?"

तर वर्ष २०११ मधील दसरा मेळाव्यात बोलताना बाळासाहेबांनी सोनिया गांधींच्या विदेशात जाऊन उपचार घेण्याच्या कृतीवर अतिशय कडक शब्दांत आक्षेप घेताना म्हणतात की, "देशातले सर्व डॉक्टर मेले आहेत का की, त्यांचा देशातील डॉक्टरांवर विश्वास नाही ? चीन, पाकिस्तानसारखे शत्रू कारवाया करत असताना मनमोहनसिं सारखे शेळपट पंतप्रधान देशाचे नेतृत्व करत आहेत."

तो सोनिया गांधींचा जावई आहे का ?

दहशतवादी अफजल गुरु, कसाबच्या लांबलेल्या फाशीबद्दल बोलताना बाळासाहेबांच्या शब्द बाणांनी काँग्रेसला घाम फोडला होता. बाळासाहेब म्हणाले होते की, "अफजल गुरुला नऊ वर्षांपासून सरकार पोसते आहे. त्याला फासावर का दिले जात नाही. तो सोनिया गांधींचा जावई आहे का ? अफजल गुरुला फाशी दिली तर काश्मीरमध्ये असंतोष उफाळेल, असे ओमार अब्दुला म्हणतो. मला शक्य झाले असते तर मी तातडीने काश्मीर विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावली असती. फालतू लोकशाही मला मान्य नाही. काँग्रेसने देशाचे डम्पिंग ग्राउंड करून ठेवले आहे."

शिवसेनाप्रमुखांनी आपल्या भाषणात नेहमीच काँग्रेस व सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. मात्र, बदलत्या काळात आज दोन्ही पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सोबत आहेत. राजकारणात नेहमीसाठी कोणीही शत्रू किंवा मित्र नसतो, याची प्रचिती देणाऱ्या या घटना आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT