Balasaheb Thackeray Last Speech : थरथरत्या आवाजातच बाळासाहेबांनी घातली साद; माझ्या उद्धव, आदित्याला सांभाळा !

Dasara Melava Last Speech of Balasaheb Thackeray : २०१२ मध्ये त्यांनी चित्रफितीद्वारे शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
Balasaheb Thackeray Last Speech
Balasaheb Thackeray Last SpeechSarkarnama
Published on
Updated on

सचिन वाघमारे

Pune : मराठी माणसाला त्याच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांच्या भल्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे शिवसेना पक्षप्रमुख व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे अनेकांसाठी दैवत आणि जीव की प्राण होते. २०१२ मध्ये त्यांच्या शेवटच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसैनिकांशी ते चित्रफितीच्या माध्यमातून संवाद साधणार हे कळताच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. साहेब उभे राहून बोलणार नाहीत हे समजल्यानंतर अनेकांच्या पायातील अवसान गळून पडले. यापूर्वी एकवेळा ते प्रकृती अस्वस्थ असल्याने दसरा मेळाव्यात बोलले नव्हते. मात्र, यावेळेस त्यांच्या वाढत्या वयोमानामुळे सर्वांनाच त्यांची काळजी लागली होती. त्यातच ते मेळाव्याला चित्रफितीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत हे वृत्त काहीसे दिलासा देणारे होते.

अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला...

दसरा मेळाव्याला बाळासाहेब येणार नसले तरी त्यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. त्यामुळे ते काय बोलणार ही उत्सुकता शिगेला पोहाेचली होती. स्क्रिनवर चित्रफीत सुरू झाली अन् काही क्षणांतच बाळासाहेब बोलू लागले. आवाजातील हरवलेला भारदास्तपणा थरथरणारे हात व बोलताना लागणारी धाप यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. थरथरत्या आवाजातच त्यांनी माझ्या उद्धव व आदित्य यांना संभाळा. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, शिवसैनिकांनो, इमान सांभाळा बेईमान होऊ नका. इमानाला महत्त्व द्या, अशी भावनिक साद बाळासाहेबांनी घालताच सर्व मैदान स्तब्ध व निःशब्द झाले. अवघ्या राज्याचे मन हेलावून टाकणारा हा क्षण. यामुळे लाखाे शिवसैनिकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले.

त्यांचे भाषण एक पर्वणीच...

एक माणूस, एक मैदान, एक सभा....हे समीकरण बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपले. तसे पाहिले तर शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण शिवसैनिकांसाठी एक पर्वणीच होती. यापूर्वीही एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रकृती अस्वस्थ्यामुळे येऊ शकले नव्हते. त्यामुळे २०१२ मध्ये झालेल्या दसरा मेळाव्याला त्यांना प्रत्यक्षात हजर राहता आले नसल्याने त्यांनी चित्रफितीद्वारे शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

मी घराणेशाही लादलेली नाही

मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल तर विसरून जा. काँग्रेस-राष्ट्रवादीसारखी घराणेशाही आमच्याकडे नाही, असे सांगून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन दसरा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे जमलेल्या शिवसैनिकांना केले. उद्धव व आदित्यला मी लादलेले नाही. तुम्ही त्यांचा स्वीकार केला आहे. यापुढेही त्यांना सांभाळा, इमानाला महत्त्व द्या, असे भावनिक आवाहन त्यांनी करताच दसरा मेळाव्याला उपस्थित शिवसैनिक हे भावनिक झाले होते.

Balasaheb Thackeray Last Speech
Balasaheb Thackeray On Sharad Pawar: मैद्याचं पोतं, म्हमद्या अन् शरद पवार...मैत्रीचं अनोखं नातं

डॉक्टरांनी शरीराची प्रयोगशाळा केली...

पुढे बाळासाहेब म्हणाले की, आज मी पूर्ण थकलो आहे, शारीरिकदृष्टय़ा कोसळलो आहे. बोलताना धाप लागते. नीट चालता येत नाही, असे सांगत शिवसेनाप्रमुख म्हणाले, मैदान गाजवणारा मी माणूस, किती दौरे, किती भाषणे केली, आता सर्व अवयव बिघडले आहेत. डॉक्टरांनी शरीराची प्रयोगशाळा केली आहे. मध्यंतरी उद्धव आजारी पडला. तो घरी आला आणि मला लीलावती रुग्णालयात नऊ दिवस दाखल करावे लागले.

शिवसैनिक झाले भावूक

दादर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा झालेला पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. ज्या दादरमध्ये शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना भवन जेथे आहे, त्याच दादरमध्ये शिवसेनेला धूळ चारली गेल्याची खंतही या वेळी त्यांनी भाषणातून व्यक्त केली. मराठी माणूस एकत्र आला तर काँग्रेसला सहज सत्तेवरून खाली खेचू शकतो, परंतु येथे दोन तुकडे का झाले याचा विचार करा, असा प्रश्न अत्यंत भावूक होत त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे उपस्थित असलेले शिवसैनिकही काहीसे भावनिक झाले होते.

शिवसेना होती म्हणूनच मुंबई वाचली...

शिवसेनेचा पाया मराठीचा आहे. हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्याबरोबर मराठी सोडले का, असा सवाल सुरू झाला. आम्ही जसे होतो तसेच आहोत. स्वीकारायचे असेल तर स्वीकारा, असे सांगून ते म्हणाले की, बाबरी मशीद पडली त्यावेळी शिवसेना होती म्हणूनच मुंबई वाचली. यापुढेही मुंबईत कोणी नंगानाच करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना शिवसेना स्टाइलने उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांवर शेलक्या शब्दांत टीका

या वेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लवासाच्या भानगडी आपल्याला माहिती आहेत, असे सांगून अजित गुलाबचंद यांना तुम्ही ओळखता का, असा सवाल बाळासाहेबांनी केला. मुंबई बहुभाषिकांची आहे या पवारांच्या विधानाचा समाचार घेताना पृथ्वीराज चव्हाण यांनी लवासाच्या भानगडींची फाइल आपल्या मांडीखाली दडवून ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्रालयाला आग लागल्यामुळेच यांचे फावले आहे. श्वेतपत्रिका काढली तरी हे राज्य सरकार वाचणार नसल्याचा टोलाही त्यांनी लगावत पिसे काढली.

देश वाचवायचा, तर गांधी परिवार दूर ठेवा

येत्या काळात देशाला वाचवायचे असेल तर काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, रॉबर्ट वडेरा आणि अहमद पटेल या पंचकडीला हटवावे लागेल. काँग्रेसने देशभर घोटाळे सुरू केले आहेत. त्याचवेळी क्लीन चिट देण्याचेही काम जोरात सुरू आहे, असे सांगून हा देश आता क्लीन चिटवाल्यांचा नाही तर ‘नेशन ऑफ चीटर्स’चा झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सोनियापासून चणेफुटाणे विकणाऱ्या कृपाशंकर सिंहपर्यंत साऱ्यांनाच हटविण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस नेत्यावर घणाघात केला होता.

या वेळी बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी भाषेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, त्यांचे जावई रॉबर्ट वडेरा, राहुल गांधी , प्रियांका गांधी या साऱ्यांचाच त्यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला.

Balasaheb Thackeray Last Speech
Vijay Wadettiwar News : EWS च्या जाहिरातीनं मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं; जरांगेंनी सरकारची केली फजिती...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com