मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरवणारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता १२ ऑगस्टपर्यंत पुढे गेली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे कायम आहे. अशातच न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणींदरम्यान सरन्यायाधीश आणि शिंदे गटाचे (Eknath Shinde) वकील हरिश साळवे (Harish Salve) यांचा काहीसा फसलेला युक्तिवाद पाहता शिंदे गटात अस्वस्थता पसरली असून सत्तेचा सारीपाट जिंकणाऱ्या भाजपमधेही (BJP) धाकधुकीचे वातावरण आहे.
या सोबतच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उद्या सुनावणी होणार असून खरी शिवसेना कुणाची यावर आयोगाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत निर्णयाची घाई करू नये, असे आवाहन केले आहे. मात्र हा आदेश त्यांच्यावर बंधनकारक नसेल असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयोगाकडील सुनावणीबाबतही संभ्रमाचे चित्र आहे.
दरम्यान, या सर्व सत्तासंघर्षात ऐनवेळी शिंदे गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रसंग ओढवला तर काय भूमिका घ्यायची यावर शिंदे गटातील आमदार संभ्रमात आहेत. सुमारे १५ आमदारांनी भाजपमध्ये विलिनीकरणास थेट विरोध दर्शविला असल्याची माहिती असून, शिंदे गटातील एक ज्येष्ठ नेत्याच्या घरी या आमदारांनी एकत्र येत भावना व्यक्त केल्याची माहिती आहे.
याच सगळ्या अडचणींमुळे बंडखोर आमदारांच्या गटात कमालीची अस्वस्थता असल्याचे मानले जाते. त्यातूनच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत राणे यांना लक्ष्य करत आदित्य ठाकरे यांच्याबाबत सहानुभूती व्यक्त केली. तर, शहाजी बापू पाटील यांनी शिंदे व ठाकरे यांनी एकत्र यावे असा आशावाद व्यक्त केल्याची चर्चा सुरू आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.